कणकवलीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

राजीव गांधी हे आधुनिक भारताचे शिल्पकार
मान्यवरांचे प्रतिपादन
कणकवली तालुका काँग्रेस कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा पदाधिकारी अनिल डेगवेकर, प्रवीण वरुणकर, वी. के. सावंत, बाळू मेस्त्री, प्रदीपकुमार जाधव, आयशा सय्यद, निलेश मालंडकर, बाबा काझी, राजू वर्णे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी राजीव गांधी यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्याविषयी आदरांजली अर्पण केली. यावेळी बोलताना वक्त्यांनी सांगितले की, राजीव गांधी हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते. संगणकीकरण, दूरसंचार, आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये त्यांनी क्रांतिकारी बदल घडवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत डिजिटल युगात यशस्वीपणे वाटचाल करत आहे.
शिक्षण आणि पंचायतराज सशक्तीकरणाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्याचे काम केले. ते एक तळमळीचे, संवेदनशील, आणि देशभक्त नेतृत्व होते ज्यांनी अखेरपर्यंत देशासाठी काम केले.
या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या स्वप्नातील आधुनिक, आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञानाधिष्ठित भारत घडवण्याचा संकल्प केला.