तब्बल 3 वर्ष रेशन धान्यापासून वंचित असलेल्या ओटव येथील वृद्धाला तहसीलदारांच्या कर्तव्यदक्षतेचा अनुभव

लाभार्थी व माजी सरपंच हेमंत परुळेकर यांनी तहसीलदारांचे मानले आभार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील ओटव या गावचे रहिवासी असलेले गिरीधर मनोहर गोवेकर या 60 वर्षीय वृद्धाला गेली 3 वर्ष रेशन धान्यापासून वंचित राहावे लागत होते. याबाबत गेले तीन वर्षे सातत्याने ओटव चे माजी सरपंच हेमंत परुळेकर यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पाठपुराव्यानंतर कणकवलीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी प्रशासकीय पातळीवर आलेली अडचण दूर करून तीन वर्षाचा प्रदीर्घ कालावधी झाल्याने गांभीर्याने याची दखल घेतली. व या श्री गोवेकर यांना धान्य पुरवठा मंजूर करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही केली. या मध्ये कणकवली पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी व तहसीलदार यांचे श्री गोवेकर व परुळेकर यांनी आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
गिरीधर गोवेकर हे गेले अनेक वर्ष ओटव या गावी राहत असून त्यांचे आधार कार्ड हे ओडिसा राज्यामध्ये लिंक दिसत असल्याने त्यांना 3 वर्षे धान्यापासून वंचित रहावे लागत होते. या प्रश्नी माजी सरपंच हेमंत परुळेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून प्रशासकीय पातळीवर सातत्याने गेली तीन वर्ष पाठपुरावा सुरू ठेवला होता. यादरम्यान तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे देखील श्री परुळेकर यांनी पाठपुरावा सुरू ठेवत या तरुणाला धान्य मिळत नसल्याबाबत लक्ष वेधले होते. तहसीलदार श्री देशपांडे यांनी या बाबत कणकवली पुरवठा विभागाचे अधिकारी श्री ढाके, चाळके व कर्मचारी यांच्या माध्यमातून या गोवेकर यांना धान्य मिळण्याकरिता प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली. व त्यानंतर नुकतेच या गोवेकर यांना हे धान्य मंजूर झाले. अशी माहिती हेमंत परुळेकर यांनी दिली. या तीन वर्षे रखडलेल्या प्रश्नाबाबत निर्णय घेत प्रश्न मार्गी लावल्याबद्दल श्री गोवेकर यांच्यासह श्री परुळेकर यांनी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व पुरवठा विभागाची अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले.