सावडाव मध्ये स्मशानभूमी रस्त्याच्या वादावरून ग्रामस्थांच्या दोन गटांमध्ये राडा

परस्पर विरोधी तक्रारी पोलिसात दाखल
महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग तर विरोधी गटाच्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल
सावडाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत पोलिसात दाखल असलेल्या तक्रारीनुसार सावडाव येथील एका विवाहित महिलेसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्पर विरोधी फिर्यादी विवाहित महिला व दत्ता काटे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून सावडाव येथील दत्ताराम मनोहर काटे याच्यासह संदीप मनोहर काटे, गणेश काटे, संतोष साळुंखे व व्यंकटेश वारंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तर दत्ता काटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव दत्तात्रय सावंत, प्रमोद रामचंद्र नरसाळे, सुरेश शामराव मोरये व एक महिला अशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हाही दाखल असल्याचे पोलीसांनी सांगितले.
सावडाव येथील विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोद नरसाळे, वैभव सावंत व आपण रस्त्यावरून घरी जात असताना दत्ता काटे हे त्याठिकाणी आले. त्यांनी प्रमोद नरसाळे यांना रस्ता का अडवितो, अशी विचारणा करत शिवीगाळ करून थापटाने मारहाण केली. यावेळी फिर्यादी तेथे जाताच त्यांना व वैभव सावंत यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच महिलेला धक्का देत खाली पाडण्यात आले. तसेच दत्ता काटे यांनी संदीप मनोहर काटे, गणेश काटे, संतोष साळुंखे व व्यंकटेश वारंग या संशयितांना बोलावून घेत मारहाण केली. संदीप काटे याने दगड उचलून वैभव सावंत यांच्या डोक्यावर व छातीवर मारून दुखापत केली, व ठार मारण्याची धमकी दिली.
यावेळी सुरेश मोरये तेथे आले असता त्यांनाही मारहाण करत धमकी देण्यात आली. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पाचही संशयितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीसांनी सांगितले.
तर दत्ता काटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावडाव ओटव रस्त्याने आपण जात असताना वैभव सावंत, प्रमोद नरसाळे, सुरेश मोरये व एक महिला यांनी आपला रस्ता अडविला. यावेळी रस्ता का अडविला अशी विचारणा केली असता आपणाला टी शर्ट काढत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच छातीवर चाकूने वार करत दुखापत केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश सावंत करत आहेत.