तळेरे येथे 27 डिसेंबरला “मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” कार्यक्रम : संवाद परिवाराचे आयोजन

तळेरे येथील मधू कट्ट्यावर ज्येष्ठ अभिनेते रमेश भिडे यांच्या “मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 27 डिसेंबर ला सायंकाळी 7 वा. होणार असून यावेळी डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संवाद परिवाराने केले असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
रमेश भिडे हे ज्येष्ठ नाट्य अभिनेते आहेत. प्रभाकरपंत पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’ या संस्थेतील अनेक नाटकांमधून पंतांबरोबर त्यानी काम केलेलं आहे. ‘नटसम्राट’ चे 76 प्रयोग, इथे ओशाळला मृत्यू 90 प्रयोग, अश्रूंची झाली फुले 150 प्रयोग, तो मी नव्हेच 750 प्रयोग केले असून एकूण 2900 नाटकांमधून अभिनय केला आहे.
डॉ. काशिनाथ घाणेकर आणि नाट्य अभिनेते रमेश भिडे यांची 11 वर्षांची मैत्री होती. या कार्यक्रमातून काशिनाथ घाणेकर यांच्या अनेक गोष्टी सादर करणार असून त्यातून त्यांचं अनोखं व्यक्तिमत्व रसिकांसमोर येईल. हा अत्यंत दर्जेदार कार्यक्रम असून यापूर्वी या कार्यक्रमाचे प्रयोग भोपाळ, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई अशा विविध ठिकाणी झाले असून आत्तापर्यंत 29 प्रयोग झालेले आहेत.
दोन अंकी हा प्रयोग असून पहिल्या अंकात डॉ. घाणेकर यांची अद्याप रसिकांना माहित नसलेली पडद्यामागील खरी ओळख करून दिली जाते. आणि दुसरा अंक डॉ. घाणेकर यांच्याकडे वेगवेगळी नाटकं आली कशी? आणि ती अजरामर झाली कशी? यावर असणार आहे. एकंदरीत डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्याशी असलेल्या मैत्रीखातर ज्येष्ठ अभिनेते रमेश भिडे हे डॉ. काशिनाथ घाणेकर यांची अज्ञात बाजू रसिकांसमोर मांडतात आणि रसिक अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन जातात.
नव्या पिढीलाही डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासारख्या कलावंताची ओळख व्हावी, यासाठी हा दर्जेदार कार्यक्रम कोणीही चुकवू नये, त्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संवाद परिवाराचे प्रमुख डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.