दहा वर्षात साधे शौचालय बांधले नाही ते शहराचा काय विकास करणार?

ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक बुवा तारी यांचा आमदार नितेश राणेंना उपरोधिक टोला
आमदार नितेश राणेंनी देवगड जामसंडे शहरात सुडाचे राजकारण केले
विकासासाठी अजून पाच वर्षे मागणे म्हणजे आमदारांचे अपयश
आमदार नितेश राणे यांनी गेल्या १० वर्षात देवगड जामसंडे शहराचा कोणताही विकास केला नाही. ते पुढील पाच वर्षात काय विकास करणार? देवगड जामसंडे शहरात गेल्या दहा वर्षात साधे शौचालय बांधू शकले नाहीत. राज्यात सत्ता आल्यानंतर विकास निधी हा केवळ ठेकेदारीवर खर्च केला. देवगडच्या पाणी प्रश्नासाठी १० वर्षात काहीही केले नाही. त्यामुळे मतांसाठी केलेल्या भावनिक आवाहनाचा काहीही उपयोग होणार नाही, असा उपरोधिक टोला ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
यावेळी देवगड विभाग प्रमुख विकास कोयंडे, नगरसेवक तेजस मामघाडी आदी उपस्थित होते. तारी म्हणाले, देवगड नगरपंचायतीमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असताना आमदार राणे यांनी नगरपंचायतीसाठी आलेला 32 कोटींचा निधी ठेकेदारीकडे वळविला. पाण्याच्या नळयोजना दुरुस्तीसाठी दीड कोटींचा निधीही उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. पाण्यासाठी आम्ही दहिबांव नदीतील २०० डंपर गाळ उपसा करून घेतला. तसेच माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून देवगडचा महत्वकांक्षी आनंदवाडी प्रकल्प ८० टक्के पूर्ण केला आहे. देवगड बंदराचा गाळ काढण्यासाठी आपण शासनाला उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे बंदरातील गाळ काढण्यासाठी ड्रेझरही दाखल झाला आहे.
देवगड नगर पंचायतीमध्ये नीतेश राणेंची सत्ता आली नाही म्हणून सुडाचे राजकारण सुरू केले. देवगडचा पाण्याचा प्रश्न तसेच इतर प्रभागातील कामे अडवून ठेवली. शिवसेनेच्या प्रभागातील कामे परस्पर बदलली त्यामुळे त्या प्रभागांमध्ये विकास कामे रखडली. त्या भागातील जनता आमदार राणेंना मतदान करणार नाही. आमदार राणे यांनी गेल्या १० वर्षात सुडाचे राजकारण केले.
ज्या नगरपंचायतीच्या पवनचक्की गार्डन बाबत प्रसिद्धी घेत आहेत त्या गार्डन साठी तत्कालीन शिवसेनेचे पालकमंत्र्यांनी निधी दिला आहे. गार्डन करताना लहान मुलांच्या खेळाचे साहित्य , पार्किंगची व्यवस्था यासाठी काहीही केले नाही.





