कार्यकारी अभियंता यांना भेटण्यासाठी उद्या आम्ही जाणारच
ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांचा इशारा
आम्ही भेटीसाठी वेळ मागूनही कार्यकारी अभियंता भेट देत नव्हते. अखेर आम्ही उद्या मंगळवार दिनांक 8 रोजी भेटीसाठी येत असल्याचे कळविल्यानंतर आज 7 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपण बैठकीसाठी मुंबईला जात असल्याचे कळविले आहे. कार्यकारी अभियंता भेट न देता पळवाट काढण्याचा प्रयत्न करत असले तरीही आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी उद्या सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयात जाणारच असल्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी दिला आहे.
या तालुक्यातील व मतदारसंघातील प्रलंबित व निकृष्ट कामांसंदर्भात चर्चेसाठी आम्ही येत असल्याबाबत कळविताच कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी सोमवारी 7 रोजी पत्र देत अशा कामांची यादी द्यावी म्हणजे त्यावर उपस्थित उपअभियंता व इतर अधिकारी यांना उत्तर देणे शक्य होईल असे कळविले आहे. तसेच आपण आचरा मार्गावरील मंजूर पुलाच्या कामाच्या अनुषंगाने बैठकीसाठी मुंबई येथे जात असल्याने उद्या 8 ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून आपल्याशी चर्चा करावयाची झाल्यास आपणास लवकरच नजीकीची तारीख ही कळविण्यात येईल असे म्हटले आहे.
मात्र असे असले तरीही आम्ही सातत्याने भेटण्यासाठी प्रयत्न करूनही कार्यकारी अभियंता भेट देत नव्हते. आता आम्ही भेटण्यासाठी येत असल्याचे कळविल्यानेच ते पळवाट काढत मुंबईला गेले आहेत. त्यामुळे त्यांनी अशा कितीही पळवाटा काढल्या तरी निकृष्ट व प्रलंबित कामाबाबत आम्ही जाब विचारल्याशिवाय गप्प राहणार नाही असे श्री पारकर यांनी म्हटले आहे.
आम्ही उद्या येणारच् तुम्ही चुकत नाहीत तर का पळता ? कशाला आचारसंहिता लागण्याची वाट पाहता काय? तुमच्या कालावधीत तुमच्या धोरणान मुळे छत्रपतींचा पुतळा कोसळला ..हे विसरू नका असे पारकर यांनी म्हटले आहे.