दिल्ली येथे भरविण्यात आलेल्या वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनासाठी खारेपाटण येथील बचत गटाच्या महिला जागृती पोटले यांची निवड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचत गटाचे करणार प्रतिनिधित्व
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय नवी दिल्ली येथे दी.१९ ते २२ सप्टेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या “वर्ल्ड फूड इंडिया -२०२४ या भारत सरकारने आयोजित केलेल्या दिल्ली येथील भव्य प्रदर्शनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून फक्त खारेपाटण येथील श्री समर्थ कृपा महिला बचत गटाला संधी प्राप्त झाली असून या बचत गटाच्या महिला प्रतिनिधी सौ जागृती जनार्दन पोटले यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
खारेपाटण येथील श्री समर्थ कृपा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ जागृती पोटले याना नुकतेच याबाबतचे लेखी पत्र नोडल अधिकारी तथा संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन ) कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे प्राप्त झाले असून नुकत्याच त्या दिल्ली येथे दी.१९ ते २२ सप्टेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या प्रदर्शनासाठी विमान प्रवासाने दिल्लीला रवाना झाल्या असून दिल्ली येथील प्रदर्शनात त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचत गटाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.ही माहिती समजताच खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी त्यांचे दूरध्वनी वरून अभिनंदन करून शुभेछा दिल्या.
सौ जागृती पोटले यांचा यापूर्वी माजी केंद्रीय उद्योग मंत्री श्री नारायण राणे यांच्या हस्ते केंद्रीय लघु सुष्म मध्यम मंत्रालयाच्या वतीने बचत गटाच्या माध्यमातून स्थानिक कोकणी पदार्थ मार्केट मध्ये आणून इतर महिलांना देखील व्यवसायाची व रोजगाराची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला होता.तर श्रीं समर्थ कृपा महिला बचत गटाचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले होते.
भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या वतीने प्रगती मैदान दिल्ली येथे होणाऱ्या या प्रदर्शनात खारेपाटण येथील श्री समर्थ कृपा बचत गटाच्या वतीने स निर्याताश प्रकल्प व नावीन्यपूर्ण असलेले पदार्थ यामध्ये मांडण्यात येणार असून कोकम बटर,कोकम सरबत व कोकम सोल हे समर्थ कृपा ब्रँड नावाने मार्केट मध्ये असलेले या बचत गटाचे विशेष पदार्थ विक्री प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
“खारेपाटण मधील एका महिलेची बचत गटाच्या माध्यमातून दिल्ली येथील प्रदर्शनात बचत गटाने स्व उत्पादित केलेले पदार्थ प्रदर्शनात मांडण्याची संधी मिळते व जिल्ह्यातून अभिनंदनीय निवड होते. ही बाब खारेपाटण गावांसाठी भूषणावह असून याबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.” अशी प्रतिक्रिया खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी व्यक्त केली. व सौ जागृती पोटले या महिलेचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.