दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांनी केला गोपाळकाला : आजी आजोबांनी घेतला आनंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे (ता. कणकवली) येथील दिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमीचा उत्सव सर्व आजी आजोबांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला. यावेळी या आजी आजोबांचा उत्साह पाहण्यासारखा होता
कौटुंबिक प्रवाहातून बाहेर पडलेल्या आजी आजोबांचे संगोपन दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचारी व संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये करत आहेत. या सर्वांना कुटुंबातील तो स्नेह, आपुलकी अनुभवता यावी, घरात साजरे होणाऱ्या पारंपारिक सणांचा आनंद मिळावा यासाठी अनेक सण व उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात.
श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमीचा उत्सव आज दिविजा वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. यावेळी दिविजा वृद्धाश्रमातील आजोबा गोपीनाथ किनळेकर यांना श्रीकृष्ण तर आश्रमातील आजी श्रीम रत्नप्रभा नरसाळे यांना राधाच्या वेशभूषेत आश्रमाचे कर्मचारी सौ अनुजा आचरेकर व सौ मंजिरी राणे यांनी सजवले. यावेळी आश्रमात श्रीकृष्ण पूजेचे आयोजन केले गेले. त्यानंतर आश्रमातील सगळ्या आजोबांनी गोविंदा रे गोपाळाचा जल्लोष करत आश्रम परिसर दणाणून सोडला. त्यानंतर आजी आजोबांचे सामुहिक नृत्य झाले. अशातच श्रीम विजया हुंबर्डेकर यांनी कलाकार भगवान दादा यांच्या चलो मटकी फोडो या गाण्यावर भगवान दादाच्या स्टाईलवर नाच केला. यावेळी सर्व आश्रम परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण झाले होते आणि शेवटी आश्रमातील आजी आजोबांनी मिळून दहीहंडीचे थर रचून 65 वर्षाच्या श्रीम रोहिता शिरोडकर या आजीने दहीहंडी फोडली. त्यानंतर काकडी केळ्याचा नैवद्य सर्वांनी घेतला.
आशाप्रकारे वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबांनी मिळून गोपाळकाल्याचा उत्सव दिविजा वृद्धाश्रमात साजरा केला. या दहीहंडीसाठी असलदे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.