तोंडवळी समुद्रकिनाऱ्याच्या शासकीय सुरुबनाला आग
दीड एकर सुरुबन तासाभरात आगीच्या भक्षस्थानी
सरपटणारे प्राणी, पक्षी जनावरांची पळापळ
आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरूच
आचरा -अर्जुन बापर्डेकर
मालवण तालुक्यतीत तोंडवळी येथील समुद्राच्या बाजूने असलेल्या सुरुबनाला रविवारी दुपारी आग लागली होती. लागलेली आग सोसाट्याचा वारा असल्याने सुमारे दीड एकरात पसरली होती. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी स्थानिकांच्या मदतीने जंगल वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. जंगलात जेसीबीच्या सहाय्याने आग रेषा आखण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मालवण व कणकवली येथील अग्निशमन बंब दाखल झाले होते किनाऱ्यालागत वाऱ्याची तीव्रता जास्त असल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न वनविभाग कडून चालू होते.
आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास स्मशान भूमिच्या बाजूने तोंडवळी सुरुबनाला आग लागली. आगीचे लोण पसरत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु आगीची एकूणच तीव्रता आणि त्या तुलनेत आग विझविण्यासाठी कार्यरत असलेले अपुरे मनुष्यबळ यामुळे आगीवर लगेचच नियंत्रण मिळवता येणे कठीण झाले होते. वनविभागाने जेसीबीच्या साख्याने जंगलात पसरलेल्या सुरुच्या काड्यांचा खच बाजूला सारत आगरेषा तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, आगीच्या दाहकतेमुळे त्यात अडचणी येत होत्या. तरीदेखील वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, वनपाल श्रीकुष्ण परीट,सावळा कांबळे, वनरक्षक लक्ष्मण आमले, शरद कांबळे, सचिन पाटील, अनिल परब, राहुल मयेकर, प्रकाश आडेलकर तसेच स्थानिक ग्रामस्थ गणेश तोंडवळकर, राजा पेडणेकर, ओमकार पाटील, सुमी झाड, नाना पाटील, प्रसाद आंबेरकर,कल्पेश नाईक, सिद्धेश पाटील,विशाल झाड,भोवर, मयूर चेंदवणकर, आशिष पाटील, प्रमोद पाटील बचावकार्यात सहभागी होते. यावेळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या अनन्या पाटील, ग्रामसेवक युती चव्हाण घटनास्थळी उपस्थित होते.
जंगली प्राण्यांची पळापळ
आगीमुळे जंगलातील सरपटमारे प्राणी, पक्षी आणि जनावरांची पळापळ झाल्याचे चित्र तोंडवळी सुरुबानात पाहायला मिळाले कित्येक वाहनधारकांना जंगलातील रस्त्यावरून सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात वाट काढताना दिसते. अजगर आणि अन्य सरपटणारे प्राणी मार्गस्थ होताना दिसत होते. सुरुची शेकडो झाडे आगीच्या मक्ष्यस्थानी पडली. लागलेल्या आगीत जंगलात मोडून पडलेल्या सुरुच्या झाडांचे भलेमोठे ओंडके देखील आगीत जळून खाक झाले होते.