सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सामाजिक बांधिलकी आदर्शवत.! – उमेश तोरसकर

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. सामाजिक,  क्रीडा, सांस्कृतिक असे विविध उपक्रम सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने  राबविलेच आहेत. याशिवाय आज आपल्यातील एका पत्रकार बांधवांच्या दुःखात सामील होत, त्यांना आर्थिक मदत करून ‘सामाजिक बांधिलकी’ जोपासून आपला आदर्श इतर पत्रकारांना घालून दिला आहे. याचा जिल्हा पत्रकार संघाला सार्थ अभिमान आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार उमेश तोरसकर यांनी नेमळे (ता. सावंतवाडी) येथे व्यक्त केले.
नेमळे येथील ग्रामीण पत्रकारिता जोपासणारे पत्रकार बांधव अर्जुन उर्फ सुनील राऊळ यांना शेतीकाम करत असताना ट्रॅक्टर चालवताना पायाला अपघात होऊन गंभीर दुखापत झाली. या घटनेची दखल घेत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आर्थिक मदत आज जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या शुभहस्ते सुपूर्त करण्यात आली. यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, सचिव मयूर चराठकर, उपाध्यक्ष दीपक गावकर, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,  प्रा. रुपेश पाटील, नरेंद्र देशपांडे, युवा पत्रकार भुवन नाईक, नीतेश देसाई, महिला पत्रकार दिव्या वायंगणकर आदी उपस्थित होते.

दरम्यान तालुका पत्रकार संघाचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून याचा आदर्श इतर पत्रकार बांधवांनी घ्यावा, असेही जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर  यांनी नमूद केले. सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले.

error: Content is protected !!