नडगीवे येथील शिवगर्जना मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला शिवजयंती उत्सव

असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांची भेट घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूचे केले वाटप

नडगिवे येथील शिवगर्जना मित्र मंडळाने दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ चा शिवजयंती उत्सव साजरा करताना यावर्षी वृद्धाश्रमास भेट देऊन समाजापुढे कृतज्ञतेचा वेगळा आदर्श ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गालगत एस.टी. बस स्टॉप जवळच्या मैदानात सलग तिसऱ्या वर्षी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. सरपंच सौ.माधवी मण्यार ह्यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी ग्रामस्थांनी महिला मुले यांच्या बरोबरच विशेष करुन ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करून शिवजन्मोत्सवाला खऱ्या अर्थाने रयतेच्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त करून दिलं. जवळच्या खारेपाटण ह्या गावी असलेल्या किल्ल्यावर भव्य बाईक रॅलीचं आयोजनही डोळ्याचं पारणं फेडणारं ठरलं. गावातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, खेळपैठणीचा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचा आविष्कारही घडवून आणला गेला.
शिवजन्मोत्सवातील यावर्षीचा विशेष उपक्रम ठरला तो असलदे येथील ‘दिविजया वृद्धाश्रमास भेट देण्याचा !’ साधारण ४० ते ५० आजी आजोबा असलेल्या या वृद्धाश्रमात फळे, मिठाई, जीवनावश्यक औषधं आणि वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने अमोल तुपविहिरे यांनी प्रस्तुत उपक्रमाच्या उद्देश्यांविषयी माहिती सांगितली व मनोगत व्यक्त केले. तर शिवगर्जना मित्र मंडळाचे अध्यक्ष अमित सावंत यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले. शिवगर्जना मित्र मंडळ आणि नडगिवे येथे येथील प्रतिष्ठित संवेदनाक्षम नागरिकांनी शिवजन्मोत्सव निमित्त आयोजन करण्यात आलेल्या या उपक्रमाचे दशकृषीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!