किल्ले गगनगडावर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

विविध संस्थांचा संयुक्त कार्यक्रम

वैभववाडी – २६ जानेवारी,२०२४ रोजी भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील किल्ले गगनगडावर ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला सन २०२४ मध्ये ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने महाराष्ट्र व कर्नाटकातील ३५० किल्ल्यांवर भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनासह विविध कार्यक्रम करण्याचे आवाहन केले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेने जिल्ह्यातील शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, शाळा, महाविद्यालये, तरुण मंडळे आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील २३ गडकिल्ल्यांवर नियोजित कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न केला. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील किल्ले गगनगडावर ध्वजवंदनाचा कार्यक्रम विविध संस्थांच्या सहकार्याने उत्साहामध्ये संपन्न झाला. राष्ट्रीय दिनांना किल्ले गगनगडावर तिरंगा ध्वजारोहण व ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न होतो. त्यामुळे
किल्ले गगनगडावर देवस्थान समितीचे ट्रस्टी श्री.रमेश माने व श्री.संजय पाटणकर यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावून शिवप्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी वैभववाडी महाविद्यालयाचे प्रा.एस.एन.पाटील, प्रा.आर.बी.पाटील, कु.शुभम राणे, मनस्वी शिंदे, उत्कर्षा पाटील व ललिता पालकर तसेच श्री.सागसांईदेवी तरुण मंडळाचे विलास पाटील, मंगेश पाटील, महेश पाटील, योगेश पाटील, विनायक पाटील, राहुल पाटील, संजय काटाळे, कृष्णात यादव, संतोष वरेकर, सुरेश वरेकर, भगवान यादव, संतोष चव्हाण आणि गगनबावडा तालुका कला मंचचे संस्थापक विनोद प्रभुलकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष गावडे, डी वाय पाटीलचे संचालक अभय बोभाटे, संतोष पाटील, रवी पाटील, दीपक गावडे, हर्षद सूर्यवंशी आदी मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सचिव व इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन.पाटील यांनी सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करून या कार्यक्रमाची संकल्पना व उद्देश याबाबत माहिती दिली. त्यानंतर शिव-प्रतिज्ञेचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थितांना गड किल्ल्यांचे महत्त्व आणि गगनगडाचा इतिहास याची प्रा.एस.एन.पाटील यांनी माहिती दिली.
छ.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांवर आज भारतीय तिरंगा ध्वज, भगवा ध्वज आणि शिवप्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे याचा आनंद वाटतो. यापुढेही हा उपक्रम चालू ठेवण्यासाठी किल्ले गगनगड देवस्थान समितीचे सहकार्य राहील असे ट्रस्टी श्री.संजय पाटणकर यांनी सांगितले.
यावेळी विनोद प्रभुलकर, संतोष पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
त्यानंतर महाराष्ट्र गीत व शेवटी उपस्थितांचे श्री.संतोष गावडे यांनी आभार मांडले. या कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना, वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग, श्री.सांगसाईदेवी तरुण मंडळ सांगशी, कोल्हापूर जिल्हा गिर्यारोहण संघटना व गगनबावडा तालुका कला मंच आणि गगनगड देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने केले होते.

error: Content is protected !!