युरेका- आयआयटी मुंबई द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत

सिंधुदुर्ग – युरेका इंडियाच्या टेक टीमने उल्लेखनीय कामगिरी करत ईयंत्र आयआयटी मुंबई द्वारे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय गेम इन्व्हेंटर स्पर्धेमध्ये अंतिम फेरी स्थान मिळवले आहे.
पायथोन या लोकप्रिय प्रोग्रामिंग लँग्वेज चा वापर व आवश्यक ती कौशल्य आत्मसात करून लोकप्रिय गेम बनवण्याच्या या स्पर्धेत भारताबरोबरच इतर देशातील मिळून एकूण 600 संघ सहभागी झाले होते.
युरेका इंडिया च्या टीम मध्ये संघप्रमुख समीहन पांगम , आर्यन गोळे, ध्रुव देसाई व कौस्तुभ दुसे यांचा समावेश आहे. सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत एकूण दहा फेऱ्या द्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहा सर्वोत्तम संघाची निवड करण्यात आली. त्यामधील आठ संघांची फायनल साठी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून आयआयटी मुंबईच्या टीम द्वारे व्हिडिओ, ऑनलाइन मार्गदर्शन, प्रश्नमंजुषा, असाइनमेंट ,साप्ताहिक अभिप्राय, ऑनलाइन चर्चा याद्वारे व्यापक मार्गदर्शन आणि विविध संध्या प्रदान केल्या जातात.
युरेकाच्या या टीमने राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन यश मिळवले असून या स्पर्धेतील फायनल पर्यंतचा प्रवास त्यांचे समर्पण ,कठोर परिश्रम, प्रोग्रामिंग आणि गेम डेव्हलपमेंटच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी वचनबध्दतेने भरलेला आहे.
या कामगिरीबद्दल अभिमान आहेच पण मुलांना टेक्नॉलॉजी बद्दल लहान वयातच माहिती व प्रोत्साहन दिल्यास विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण करू शकतात याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
युरेका टीम अंतिम फेरीसाठी सज्ज झाली असून आपली तांत्रिक प्रतिभा ही केवळ समतुल्य नाही तर जागतिक स्तरावर उत्कृष्ट आहे हे सिद्ध करण्यास इच्छुक आहे.
या क्षेत्रात कार्यरत असलेले श्री भूषण पांगम यांनी केलेले मार्गदर्शन व त्यांनी दिलेला पाठिंब्याने युरेकाच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात मोलाची भूमिका बजावली.
महत्त्वाचे म्हणजे या टीममधील समीहन , आर्यन व ध्रुव हे 25 जानेवारीपासून गोवा येथे सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी होणार असून ते GOAtronics या टीमचे सदस्य सुद्धा आहेत.
या उत्तुंग कामगिरीबद्दल GOAtronics च्या टीम मॅनेजर सौ अक्षया धेम्पो , युरेकाच्या सौ सुषमा केणी, सौ शितल वाळके तसेच चैतन्य प्रबोधिनीच्या सौ सुप्रिया मोरजकर यांनी टीमचे अभिनंदन केले असून टीमला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्यात