कणकवली नगरपंचायत प्रशासन सुस्तावलेले?

बाजारपेठेत रस्त्यावर दुकाने, वाहतूक कोंडीची समस्या
नगरपंचायत चे लक्ष वेधल्यावर दिखाऊ कारवाई, पुन्हा परिस्थिती “जैसे थे”
गेले काही दिवस कणकवली नगरपंचायत मध्ये मुख्याधिकारी प्रभारी व नगरपंचायत मध्ये लोकप्रतिनिधी कुणीही नसल्याने कणकवली बाजारपेठ रस्त्यावर विक्रेत्यांकडून थेट रस्त्यावर दुकाने लावून सर्वसामान्य जनतेला मनस्ताप व त्रास दिला जात आहे. कणकवली नगरपंचायत चे पथक याकडे डोळेझाक करत असून, एकदा लक्ष वेधल्या नंतर पुन्हा या सगळ्या अनागोंदी कारभाराकडे लक्ष देण्यासाठी कणकवली नगरपंचायत ला वाली कुणी नसल्याची चित्र आहे. काही दिवसांपूर्वी नगरपंचायत चे लक्ष वेधल्यानंतर नगरपंचायत पथकाने केवळ दिखाऊ कारवाई केली. मात्र आता पुन्हा नगरपंचायत ची पाठ फिरल्यानंतर बाजारपेठ रस्त्यावर खुलेआम लावल्या जाणाऱ्या दुकानांमुळे बाजारपेठेतील रस्त्यावर नियमित वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. आज बुधवारी सकाळपासून बरोबर ही समस्या उद्भवत होती. आज सकाळपासून ही सर्व स्थिती असताना नगरपंचायत चे प्रशासन झोपा काढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनधिकृत वाहने पार्किंग करणाऱ्या व रस्त्यावर दुकाने लावणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होणार का? की नगरपंचायत प्रशासन केवळ मलमपट्टी पुरते कारवाईचा दिखावा करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली