दोडामार्गमध्ये उद्या राष्ट्रवादीचा मेळावा

खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार
अर्चना घारे-परब यांना बळ मिळणार
प्रतिनिधी l दोडामार्ग तालुक्यात शुक्रवारी (ता .२७) राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत येथील महालक्ष्मी सभागृहात सकाळी दहा वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र राज्यात झंझावाती दौरा सुरू केला आहे, त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यकर्ता मेळावा संपन्न होत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला प्रमुख अर्चना घारे परब यांनी गेल्या काही वर्षात या मतदार संघात आपले स्थान निर्माण करताना लोकोपयोगी अनेक कामे केली आहेत, त्यांनाही सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्याने अधिक बळ मिळेल हे निश्चित, दोडामार्ग तालुक्यात सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर आणि उपजिल्हाध्यक्ष संदीप गवस यांच्या माध्यमातून व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस चांगली वाटचाल करत आहे, त्याला सौ.अर्चना घारे परब ह्या साथ देत असल्याने सावंतवाडी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होत आहे.येथील पुढील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकूणच सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याने दोडामार्ग मधील व एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत नवचैतन्य आहे हे निश्चित.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघात गेले तीन टर्म निवडून येत आहेत, तेही मोठ्या मताधिक्याने. गेल्या निवडणुकीत अर्चना घारे परब यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळेल असे वाटत होते; मात्र त्यांची संधी हुकली. त्यानंतरही घारे परब यांनी आपले या विभागात लोकोपयोगी काम सुरूच ठेवले. या तिन्ही तालुक्यात त्यांना ओळखत नाही असा माणूस सापडणार नाही, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकारण आदी विभागात त्यांचे सध्याचे कार्य वाखाणण्याजोगे असून त्यांनी आपला वेगळा चाहता वर्ग बनवला आहे, त्यामुळे याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या व त्यांनतर शिवसेना व नंतर शिंदे गटात जाऊन शिक्षण मंत्री बनलेल्या दीपक केसरकर यांना पर्याय म्हणून अर्चना घारे परब यांच्याकडे पाहिले जात आहे, सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याने अर्चना घारे परब यांना बळ मिळण्याची शक्यता आहे