मराठा समाजातील तरुणांनो… राज्यसरकारने दिलेले आरक्षण टिकले पाहिजे, कायद्याचा आधार असला पाहिजे त्यासाठी सहकार्य करा – सुनिल तटकरे

मुंबई – सकल मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने अनेक मोर्चे काढले. त्यावेळी कुठे गालबोट लागले नाही मात्र आज जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. सरकारने आरक्षण मिळावे यासाठी पाऊले टाकली आहेत,आरक्षणासाठी राज्यसरकार सकारात्मक आहे त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनो राज्यसरकारने दिलेले आरक्षण टिकले पाहिजे, कायद्याचा आधार असला पाहिजे त्यासाठी सहकार्य करा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे बुधवारी सायंकाळी प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांनी त्यांना काही प्रश्न विचारले असता त्यावर सुनिल तटकरे यांनी उत्तरे दिली.
मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे ही राज्यसरकारची भूमिका आहे असे स्पष्ट करतानाच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरक्षण दिले गेले ते उच्च न्यायालयात टिकले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही दिले गेले मात्र सर्वोच्च न्यायालयात काही कायदेशीर बाबी नमूद करून आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. आताही आमची आरक्षण मिळावे हीच भूमिका आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही एका झालेल्या बैठकीत आरक्षण दिले पाहिजे त्यामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता दिले पाहिजे अशी भूमिकाही मांडण्यात आली होती आणि यावर एकमतही झाले होते. कायद्याच्या कसोटीत आरक्षण टिकले पाहिजे असे मराठा नेतृत्वांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यसरकारने एक पाऊल पुढे टाकत शिंदे समिती स्थापन करून ही समिती राज्यव्यापी दौरा करत आहे. आरक्षण देण्याबाबत महायुतीतील पक्ष सकारात्मक आहेत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे. पोलीस तपास सुरू आहे. आरोप – प्रत्यारोप होत राहतील परंतु सरकारने या सर्व प्रकरणाची खोलवर सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केली.
कदाचित उध्दव ठाकरे यांच्या पक्षात झालेल्या बंडाचे शल्य त्यांच्या मनात असावे. नाराजी असू शकते. त्यामुळे अजितदादा पवार यांचा मंत्रिमंडळातील सहभाग हा एकटयापूरता सीमित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून घेतलेला तो निर्णय आहे. एनडीएमध्ये सहभागी होत असताना अत्यंत विचारपूर्वक उद्याच्या भवितव्याची पाऊले उचलण्याच्यादृष्टीकोनातून निर्णय घेतला गेला. त्यामुळे टिका करण्याचा अधिकार उध्दव ठाकरे यांना आहे तो ते करत राहतील असे मत सुनिल तटकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्या टिकेवर व्यक्त केले.
संजय राऊत हे अलीकडे दिवसभर पत्रकार परिषदेत काय काय बोलतात याची कल्पना नाही परंतु सरकारपासून जपून रहा म्हणजे त्यांना काय सूचित करायचे आहे हे त्यांनाच तुम्ही विचारा असा प्रतिप्रश्न सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला.