कॅरम निवड स्पर्धेत वाद; अंबिका हरिथच्या वर्तनावर महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा आक्षेप

सोनाली कुमारीचे नुकसान झाल्याचा दावा
चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमणार
दिल्ली येथे २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या राष्ट्रीय मानांकन निवड कॅरम स्पर्धेत महिला एकेरीच्या सामन्यावरून वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या १९ वर्षीय उदयोन्मुख खेळाडू सोनाली कुमारी आणि रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधित्व करणारी अंबिका हरिथ यांच्यात झालेल्या सामन्यात अंबिका हरिथ यांनी अखिलाडूवृत्तीचे वर्तन केल्याचा आरोप महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी केला आहे.
आगामी विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पंचांशिवाय सामने खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच सामन्याचे मोबाईल किंवा कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्डिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सामन्यात वाद निर्माण झाल्यास रेकॉर्डिंगच्या आधारे निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अनेक सामने खेळाडूंच्या संमतीने कॅमेऱ्याविना खेळवण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केला आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने ११ सप्टेंबर रोजी फेडरेशनकडे सामन्यांसाठी पंच नियुक्त करण्यास तसेच खेळाडूंसोबत मॅनेजर पाठवण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, फेडरेशनने आपला निर्णय कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर सोनाली आणि अंबिका यांच्यातील सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला.
असोसिएशनच्या निवेदनानुसार, सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये सात बोर्डनंतर सोनालीने मिळवलेल्या गुणांच्या स्कोअरबाबत संभ्रम निर्माण झाला. सोनालीने अंबिकाकडे बोर्डवरील सोंगट्यांची संख्या विचारल्यानंतर अंबिकाने चुकीची संख्या सांगितल्याने सोनालीने स्कोअर १९ ऐवजी १८ असा नोंदविल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, स्पर्धेचे अधिकृत साहित्य भागीदार असलेल्या सिनको चॅनेलवरील थेट प्रक्षेपणात स्कोअर १९-१७ असा दिसत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
यानंतर अंबिकाने ८व्या बोर्डनंतर १८-१८ असा स्कोअर लिहून पुढील बोर्ड सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित प्रेक्षकांनी आक्षेप घेत सोनाली विजयी झाल्याचे सांगितले. थेट प्रक्षेपणातील स्कोअरनुसारही सोनाली विजयी असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. त्यानंतरही सामना पुढे खेळवण्यात आला आणि पुढील बोर्ड तसेच अंतिम सेटमध्ये अंबिकाने विजय मिळवत सामना जिंकल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकारानंतर महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अंबिका हरिथ यांच्याशी संपर्क साधून सामना हरल्याचे मान्य करावे आणि उदयोन्मुख खेळाडू सोनाली कुमारीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी विनंती केल्याचे अरुण केदार यांनी सांगितले. मात्र, या विनंतीनंतरही अंबिकाने पुढील सामना खेळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सोनाली कुमारीला आगामी विश्व अजिंक्यपद स्पर्धेला मुकावे लागल्याचा दावा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केला आहे. दरम्यान, अंबिका हरिथ यांच्या वर्तनाबाबत असोसिएशनने गंभीर दखल घेतली असून, त्यांच्यावर कोणती कारवाई करावी यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात येणार आहे. समितीच्या शिफारसीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे अरुण केदार यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच हा प्रकार रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून देण्यात आला असून, राष्ट्रीय पातळीवर संस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूच्या या कथित वर्तनाची बँकेनेही दखल घ्यावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने व्यक्त केली आहे.






