कुडाळच्या जुन्या कोर्टाच्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांचे संग्रहालय उभारण्याची मागणी

कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कुडाळ येथील सध्या अस्तित्वात असलेले न्यायालय स्थलांतरित झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे दर्शन घडविणारे संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आले.
कुडाळ येथील न्यायालयाची वास्तू आणि परिसराला ऐतिहासिक महत्त्व असून, या परिसराचा संबंध छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाशी असल्याचे विविध दाखले असल्याचा दावा समितीने निवेदनातून केला आहे.
या ऐतिहासिक वास्तू व परिसराचे जतन करण्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, कार्य आणि जीवनप्रवास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या ठिकाणी संग्रहालय उभारण्यात यावे, अशी समितीची मागणी आहे.
प्रस्तावित संग्रहालयामुळे कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे. या प्रकल्पासाठी शासनाने आवश्यक ते शासकीय सहकार्य तसेच आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद महादेव शिरसाट, उपाध्यक्ष नितीन शिरसाट आणि खजिनदार राजन माडये उपस्थित होते.






