जांभा चिरेखाण व्यवसायाला DIGITP प्रणालीतून वगळा

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील व्यावसायिकांच्या अडचणींकडे महसूलमंत्र्यांचे आमदार प्रमोद जठार यांनी लक्ष वेधले

छापील पास पद्धत पुन्हा सुरू करण्याची मागणी

कोकणातील पारंपरिक जांभा चिरा (Laterite Stone) उत्खनन व वाहतूक व्यवसायाला शासनाच्या DIGITP ऑनलाईन पास प्रणालीतून कायमस्वरूपी वगळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत कोकण विभागाचे भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन कोकणातील जांभा चिरेखाण व्यावसायिकांच्या अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जांभा चिरा व्यवसाय हा अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने सुरू असून, या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात कामगार, वाहनचालक तसेच संबंधित लघुव्यावसायिकांचा रोजगार अवलंबून आहे. जांभा चिरा खाण मालक असोसिएशननेही DIGITP प्रणालीतून या व्यवसायाला वगळण्याची मागणी केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने गौण खनिज वाहतुकीसाठी DIGITP ऑनलाईन पास प्रणाली अनिवार्य केली आहे. मात्र, जांभा चिरेखाणी दुर्गम डोंगरमाथ्यावरील सड्यांवर असल्याने तेथे अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसते. त्यामुळे प्रत्यक्ष खाण परिसरातून ऑनलाईन पास तयार करण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय DIGITP प्रणालीसाठी आवश्यक असलेला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक खाणमालकाकडे असणे आवश्यक आहे. मात्र, खाणमालकांचा मोबाईल क्रमांक बँकिंग व्यवहार व इतर शासकीय कामांसाठी वापरला जात असल्याने तो कायम खाण परिसरात उपलब्ध ठेवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.
भाडेतत्त्वावरील वाहनांवरील GPS प्रणालीचा अभाव हीदेखील मोठी अडचण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागात जांभा चिऱ्याची वाहतूक प्रामुख्याने स्थानिक व लहान भाडेतत्त्वावरील वाहनांमधून केली जाते. या वाहनांमध्ये GPS नसल्यामुळे DIGITP प्रणालीवर पास काढताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व बाबींचा विचार करून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभा चिरेखाण व्यवसायाला DIGITP प्रणालीतून कायमस्वरूपी वगळावे किंवा या व्यवसायासाठी स्वतंत्र सुलभ प्रक्रिया निश्चित करावी, तसेच पूर्वीप्रमाणे छापील पास पद्धत पुन्हा सुरू करावी, अशी आग्रही मागणी प्रमोद जठार यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.

error: Content is protected !!