संविता आश्रमातील बांधव व धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सहभागातून पणदूर तिठा परिसर आणि कसाल गाव येथे स्वच्छता मोहीम उत्साहात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पणदूर ग्रामपंचायत क्षेत्रातील पणदूर तिठा परिसर आणि कसाल गाव येथे संविता आश्रमाच्या वतीने स्वच्छता मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आली. “स्वच्छता ही सेवा” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात आश्रमातील बांधव, कर्मचारी तसेच धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयचे BSW प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांचे या मोहिमेला मार्गदर्शन राहिले.

बस स्टॅन्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, बाटल्या, काचेचे तुकडे, कुरकुरेचे पॅकेट, कागद, पालापाचोळा तसेच ओला व सुका कचरा साचलेला होता. स्वयंसेवकांनी गट तयार करून परिसराची स्वच्छता केली. काहींनी झाडू मारले तर काहींनी कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. काचेचे तुकडे आणि प्लास्टिक वेगळे करून सुरक्षितरीत्या जमा करण्यात आले. सर्वांनी मनापासून श्रमदान केल्याने परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला.

या अभियानात स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले. पणदूर ग्रामपंचायत चे उपसरपंच यांनी स्वयंसेवकांचे स्वागत करून त्यांना नाश्त्यासाठी वडापाव आणि शीतपेय उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्वयंसेवकांना अधिक प्रोत्साहन मिळाले.

अभियानानंतर स्वयंसेवकांनी अनुभव व्यक्त करताना सांगितले की, या मोहिमेमुळे स्वच्छतेचे महत्त्व, श्रमदानाची भावना, टीमवर्क, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव अधिक दृढ झाली. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि स्वच्छ परिसर राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.

स्वच्छता मोहिमेत मयुरी लोट, सुषमा अनावकर ,आश्रम निवासी महिला भगिनी पूर्वा सामंत, शान सुप्रिया राऊळ, एलबिना, बीबी, पूजा शिंदे, परवीन, विद्या पुरुष बांधव शांताराम पाटणकर, बंड्या, टकल्या, दीपक, संदेश वाहन चालक केविन डिसोजा समाजकार्य विद्यार्थी दुर्गेश मंडलिक, दिक्षा भोये, साक्षी बागुल, सचिन हालोरे, विश्वजित वाघ, दिलीप हालोर, दुर्गेश मंडलिक, मयुर पवार आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व, श्रमदानाची भावना आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

error: Content is protected !!