कुडाळात हॉटेल मालकाला ग्रामीण रुग्णालयाची नोटीस

अतिक्रमण करून बांधलेले हॉटेल ७ दिवसात पाडण्याचे आदेश
कुडाळ : शहरातील राजमाता जिजामाता चौकासमोर असलेल्या कुडाळ ग्रामिण रुग्णालयाच्या जागेमध्ये अनधिकृत हॉटेल बांधून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल रुचकरच्या मालकाला कुडाळ ग्रामिण रुग्णालय प्रशासनाकडून सदर अनधिकृत बेकायदा अतिक्रमण करून बांधलले हॉटेल स्वखर्चाने सात दिवसांच्या आत काढण्याची नोटीस १५ डिसेंबर रोजी काढून बजावण्यात आली आहे.
गेली काही वर्ष या ठिकाणी शासकिय जागेत अतिक्रमण करून हा हॉटेल व्यवसाय सुरू आहे याबाबत तेथील ग्रामस्थांनी रीतसर तक्रार केली होती. तहसिलदार यांनीही याबाबत सदर बोधकाम काढण्याबाबत सूचीत केले होते. मात्र राजकिय दबावामुळे अतिक्रमण हटविण्यात आले नव्हते .
शहरातील मुख्यरस्त्या वरील जिजामाता चौकासमोरील माठेवाडा येथे जिल्हा / ग्रमिण रुग्णालयाची म्हणजे आरोग्य विभागाची जागा आहे. या जागेमध्ये अनधिकृत हॉटेल व्यवसाय सुरू आहे. या बाबत तक्रार झाल्यावर जागा कोणाची असा प्रश्न पुढे करून लक्ष दुसरीकडे वेधण्यात आले होते. दरम्यान नगरपंचायतीने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतल्यावर हा विषय ऐरणीवर आला होता. त्यावेळ जिल्हा आरोग्य विभागाने जमिन मोजणी करून हदद निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दोन महिन्यापूर्वी जिल्हा रुग्णालयाने रुग्णालयाच्या जागेची मोजणी केली. या मोजणी क्षेत्रांमध्ये असलेली जागा निश्चित झाल्यानंतर या जागेमध्ये अनधिकृत हॉटेल उभारल्याचे निष्पन्न झाले. गेले अनेक वर्ष राजकीय वरदहस्तामुळे हे हॉटेल सुरू होते.
दरम्यान जिल्हा रुग्णालयाने जागा निश्चित झाल्यानंतर आपली हद्द सिमेंटचे खांब उभारून निश्चित केली. आता रुग्णालयाच्या जागेमध्ये हॉटेल व्यवसाय अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय कुडाळ प्रशासनाने हॉटेल रुचकरच्या मालकाला हे हॉटेल सात दिवसाच्या आत काढण्याची नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावल्याचे कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वाळके यांनी सांगितले. स्वखर्चाने बांधकाम न काढल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
कविलकाटे येथील पेडणेकर कुटुंबीय हे हॉटेल होण्यापूर्वी चहाचा स्टॉल त्याठिकाणी चालवत होते. मात्र राजकीय दबाव टाकून या गरीब पेडणेकर कुटुंबीयांना त्यांच्या चहाच्या स्टॉलसह हटवून पक्के बांधकाम करण्यात आले आणि त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात आला होता.





