कलमठ ग्रामस्थांनी गावातील रस्त्याला पडलेले खड्डे स्वतः बुजवले

प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा
कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन देखील उदासीनता
कणकवली पटवर्धन चौक ते कलमठ बाजारपेठ – वरवडे – आचरा जाणाऱ्या मार्गावरील रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय दयनीय अवस्थेत असून, मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर वारंवार अपघात घडत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
दररोज हजारो विद्यार्थी, ग्रामस्थ आणि व्यापारीवर्ग या रस्त्याने प्रवास करत असल्याने रस्त्याची ही दुर्दशा अत्यंत धोकादायक ठरत आहे. हा कलमठ बाजारपेठेचा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे वारंवार ट्रॅफिक जाम निर्माण होतो आणि नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
ग्रामपंचायत सदस्य धीरज श्रीधर मेस्त्री यांनी दोन दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, कणकवली यांना निवेदन देऊन रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र दोन दिवस उलटूनही कोणतीही हालचाल न झाल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी स्वतः रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.
या वेळी विनायक (बाळू) मेस्त्री, सुंदर कोरगावकर, नितीन (आबा) मेस्त्री, अभिजित सावंत, किरण हुन्नरे, संजय बेलवलकर, राजन (अण्णा) कुशे, ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, माजी उपसरपंच वैदेही गुडेकर, विलास गुडेकर, सुयोग कांबळी, नितीन पेडणेकर, निश्चय हुन्नरे, द्विजू लोकरे, आशिष मेस्त्री आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर कलमठ ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वळावे, आणि तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा मिळावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.





