शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कार नांगरमुठी कादंबरीला जाहीर

प्रभा प्रकाशनातर्फे पुरस्काराचे आयोजन : वैभववाडी येथे वितरण
महाराष्ट्रातील गुणवंत नव्या साहित्यिकांना प्रेरणा देण्यासाठी प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे पुरस्कार योजनेचे आयोजन करण्यात येते. प्रभा प्रकाशनाच्या या वर्षीच्या शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव कादंबरी पुरस्कारासाठी राधानगरी येथील कादंबरीकार पांडुरंग पाटील यांच्या दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'नांगरमुठी' या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. पाच हजार रुपये, स्मृति चिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाच्या या पुरस्काराने कादंबरीकार पाटील यांना नोव्हेंबर मध्ये वैभववाडी येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराची निवड नामवंत समीक्षाक डॉ. दत्ता घोलप आणि प्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर यांनी केली.
प्रभा प्रकाशन कणकवली ही कोकणातील अग्रगण्य प्रकाशन संस्था. अल्प कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील नव्या जुन्या लेखकांचे ग्रंथ प्रकाशित करून चांगलं लेखन अभिजात वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. आता गेल्या वर्षीपासून प्रभा प्रकाशनातर्फे इतर प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या महाराष्ट्रातील लेखक कवींच्या उत्तम ग्रंथांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. तथापि यावर्षीपासून प्रभा प्रकाशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव कादंबरी पुरस्कारासाठी पांडुरंग पाटील यांच्या 'नांगरमुठी' या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
पांडुरंग पाटील हे ग्रामीण भागातील लेखक असून व्यवसायाने शेती करतात. आपल्या शेती व्यवसायाच्या विदारक अनुभवातून 'नांगरमुठी' या कादंबरीचे लेखन करण्यात आले आहे. नामवंत लेखक आसाराम लोमटे यांनी या कादंबरीची पाठराखण केली असून त्यात ते म्हणतात, या कादंबरीची कहाणी एका कुटुंबापुर्ती न राहता पाहता पाहता समस्त कुळवाडींच्या आयुष्याचा नकाशा म्हणून आपल्यासमोर उभी राहते. लोकजीवनाला लाभलेले बोली भाषेचे अस्तर हे या कादंबरीचे बलस्थान आहे. आशय आणि रूपबंधाच्याही दृष्टिकोनातून 'नांगरमुठी'ची पकड अद्वितीय आहे. वर्षानुवर्षे पडीक राहिलेल्या जमिनीत खोलवर नांगराचा फाळ घुसावा आणि त्याने कुंधा, हरळीला तळामुळातून उखडून टाकत मातीचे काळीज उघडे करावे तसा जोरकस परिणाम या कादंबरीने समर्थपणे साधला आहे.





