निवडणूकीच्या तोंडावर बदनाम करण्याची व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे;त्या’ प्रकरणाशी माझा सुतराम संबंध नाही – सुनिल तटकरे

संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून प्रचंड उत्साह मतदारांच्या मनात पहायला मिळत आहे;४ जूनला विजयाची पुनरावृत्ती होणार…
अलिबाग – आज ‘कृषीवल’ दैनिकात जे काही छापून आले आहे ‘त्या’ प्रकरणाशी माझा सुतराम संबंध नाही. केंद्रीय यंत्रणांनीच हे सर्व स्पष्ट केले असताना निवडणूकीच्या तोंडावर बदनाम करण्याची व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वर्तमानपत्राबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून आरोप – प्रत्यारोप वेगवेगळ्या पद्धतीची भाषणे होणे स्वाभाविक आहे. निवडणूकांमध्ये संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये अभिप्रेत आहे. फक्त ते होत असताना वस्तुस्थितीवर आधारित सभ्यतेने व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच अलीकडे ज्यापध्दतीने आरोप केले जात आहेत गलिच्छ शब्दामध्ये टिकाटिपण्णी केली जाते ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
देशाचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत. त्यांच्याबद्दल वापरली जाणारी वाक्य गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केली जाणारी वक्तव्य ऐकल्यानंतर वैचारिकदृष्ट्या कुठे चाललाय माझा महाराष्ट्र अशा प्रकारच्या वेदना मनामध्ये होत असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केल्या.
बाळशास्त्री जांभेकरांनी आद्य मराठी पत्रकारिता सुरू केली. काही वर्तमानपत्र देखील आपापल्या पक्षाची मुखपत्र असतात… असावी लागतात. त्यात दुमत असण्याचे कारण नाही, पण तरीसुद्धा द्वेषाने कल्पोकल्पित काही गोष्टी टाकण्याची भूमिका घेतली जाते त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
आज कृषीवल वर्तमानपत्रात पहिल्या पानावर सिंचन घोटाळा प्रकरणी सुनिल तटकरे अडचणीत आले मग उच्च न्यायालयात धाव घेतली असे आले आहे मात्र या प्रकरणाची चौकशी एसीबीने उघडरित्या उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी केली. नागपूरच्या उच्च न्यायालयात माझ्यावर, अजितदादांवर जे काही आरोप करण्यात आले त्याची उघड चौकशी होईल असे राज्यसरकारच्यावतीने नागपूरच्या उच्च न्यायालयात जाहीर केले गेले होते. त्याप्रमाणे एसीबीने सखोल चौकशीही केली होती. संबंध चौकशी पोलीस महासंचालक लाचलुचपत यांच्या देखरेखीखाली झाली होती. त्यात माझ्याशी संबंधित कोणताही विषय नव्हता. यासंदर्भात देखील सखोल चौकशी झाली. एसीबीच्या, सीबीआयच्या चौकशीत सर्व पर्याय वापरून चौकशी झाली. त्यासंदर्भात एक एफआयआर ठाण्यात दाखल झाला मात्र त्या एफआयआरमध्ये कुठेही माझं नाव नाही आणि नव्हते त्यासंदर्भात चार्जशीटही दाखल झाली होती त्यातही माझं कुठे नाव नव्हते. ज्यांच्या संदर्भात चार्जशीट दाखल करत स्पेशल एसीपी कोर्टात हा दावा चालला त्या एसीपी कोर्टानेही ज्यांच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल केले. त्या सर्वांनाच क्लीनचीट दिली आणि त्या प्रकरणामध्ये ‘नॉट अ सिंगल फेल’ एकही रुपया खर्च झाला नाही त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे येतच नाही कारण खर्चच झाला नाही असे स्पष्ट केले होते. त्यालासुद्धा दोन वर्षे उलटून गेली.
एखाद्या विशिष्ट कोर्टाने निकाल दिल्यानंतर अपिलकर्त्यांना तो अधिकार राहू शकतो. तो दुसरा कुणाला नसतो जी कुणी यंत्रणा दाखल करत असते त्यांनाच… मात्र जे कुणी तथाकथित बबलू सय्यद यांनी निवडणूकीच्या तोंडावर गेल्या दोन महिन्यात ते कुणाला भेटले, त्यांनी कुणाला कॉल केला, मुंबईला कुणाला जाऊन भेटले याची इत्थंभूत माहिती असल्याचे सांगतानाच मला या विषयावर आज काही बोलायचे नाही असेही स्पष्ट केले.
या सगळ्या बनावट आणि खोटी कारणे पुढे करत बातमी करण्यात आली आहे. ॲड. मानसी म्हात्रे यांच्या वकीली ज्ञानाबद्दल दुमत नाही. पण त्यांचे वक्तव्य जे वर्तमानपत्रात छापून आले आहे ती आलेली बातमीच सुनिल तटकरे यांनी यावेळी वाचून दाखवली.
वर्तमानपत्रात आलेल्या बातमीसंदर्भात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल असे स्पष्ट संकेत देतानाच केवळ निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्याची व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे असा थेट आरोप सुनिल तटकरे यांनी केला.





