माजी विद्यार्थी संघटना टोपीवाला हायस्कूलचा उपक्रम

माजी विद्यार्थी संघटनेतर्फे ( MVS) दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी, टोपीवाला ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी JEE, NEET व CET मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धात्मक परीक्षांची माहिती मिळावी, त्यांच्या तयारीची योग्य दिशा ठरावी आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळावे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी MVS चे सभासद आणि १९८९ SSC बॅचचे विद्यार्थी डॉ. महेश अभ्यंकर हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष श्री. प्रमोद मोहिते यांनी डॉ. महेश अभ्यंकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वळंजू सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर श्री. शेवडे सर यांनी डॉ. महेश अभ्यंकर यांचा परिचय आपल्या ओघवत्या शैलीत करून दिला. त्यांनी डॉ. अभ्यंकर यांच्या कार्याचा व अनुभवाचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वळंजू सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या विविध उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच JEE, NEET आणि CET या परीक्षांचे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीतील महत्त्व थोडक्यात विशद केले.
यानंतर कार्यक्रमाचे संचालक डॉ. महेश अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांना JEE व NEET या परीक्षांचे महत्त्व स्वानुभवातून स्पष्ट केले. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कशी करावी, त्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, अभ्यास करताना येणाऱ्या विविध अडचणी व अडथळ्यांवर कशी मात करावी, सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व काय आहे, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीबाबत निश्चितच नवी दिशा मिळाली.
या कार्यशाळेस टोपीवाला ज्युनियर कॉलेजचे इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी, तसेच इयत्ता दहावीचे विद्यार्थी आणि जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमधील दहावीचे विद्यार्थी असे एकूण ३०० विद्यार्थी उपस्थित होते. तसेच इयत्ता दहावीला मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि कॉलेजचे शिक्षक यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव श्री. नंदन देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रेरणा आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीची दिशा देणारी MVS तर्फे आयोजित ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरली.






