बेळणे खुर्दमध्ये करपलेल्या भातशेतीची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

गावपातळीवर पाणी अडवून साठवणूक व भूजल पुनर्भरणाला प्राधान्य देण्याचे आवाहन
पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पाण्याअभावी भातशेती करपण्याची परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील बेळणे खुर्द गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. चेतन चाळके आणि रामकृष्ण चाळके यांच्या शेतातील भात पिकाची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाअभावी भात पीक करपण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावेळी सरपंच अविनाश राजाराम गिरकर यांनी गावातील शेती आणि पाणी उपलब्धतेची सद्यस्थिती पालकमंत्र्यांना सांगितली.
बेळणे खुर्द परिसरात धरण असून पूर्वी पाटाच्या माध्यमातून शेतीला धरणातील पाणी मिळत होते. सध्या पाण्याची उपलब्धता नसल्याने शेती अडचणीत आली आहे. धरणातील पाणी कॅनॉलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याचा पर्याय निर्माण होईल, अशी माहिती शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिली.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा घेतला आढावा
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, गेल्या वर्षीची आणि यंदाची परिस्थिती, पावसातील फरक तसेच सध्याच्या परिस्थितीची तीव्रता प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहोत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संपूर्ण प्रशासनासोबत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत.
शेती, विहिरी आणि पाण्याच्या उपलब्धतेची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊन शासनाची मदत योग्य लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाभर पाहणी दौरे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट आणि जास्तीत जास्त मदत देण्यास प्राधान्य राहील. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी शासन घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज
कोकणात जवळपास ३ हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि साठवणूक न झाल्यामुळे आज दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी अडवून त्याची साठवणूक तसेच भूजल पुनर्भरण योग्य पद्धतीने केले, तर भविष्यात अशी परिस्थिती टाळता येईल, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
गावपातळीवर उपलब्ध पावसाचे पाणी अडविण्यासाठी लहान बंधारे, जलसंधारणाची कामे आणि इतर स्थानिक उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यातील गरजांचा विचार करत आतापासूनच गावागावांत पाणी अडविणे, साठविणे आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह जलसंधारण, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.






