कणकवली शहरातील व्यापारी संकुल, बस स्थानक सुशोभीकरण व आशिये रस्ता कामाबाबत एसटीचे एमडी सकारात्मक!

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी एमडी दिनेश महाजन यांची भेट घेत केली चर्चा
या शुभीकरण व व्यापारी संकुल कामाचा डीपीआर तयार करून लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन
कणकवली शहरात एसटी डेपो च्या महामार्गाच्या बाजूच्या जागेमध्ये व्यापारी संकुल, त्यासोबत कणकवली बस स्थानकाचे सुशोभीकरण व कणकवली आशिये जोडणारा रस्ता या प्रामुख्याने तीन विषयांच्या संदर्भात एसटीचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी या तिन्ही प्रस्तावा बाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, या कामांचा डी पी आर तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. तसेच डी पी आर पूर्ण झाल्याबरोबर नगरपंचायत व एसटी प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत त्यांचे देखील या प्रश्नी लक्ष वेधले होते. कणकवली शहरात व्यापारी संकुल उभारण्या संदर्भात नगराध्यक्ष श्री. पारकर यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेतली. यावेळी कणकवली बस स्थानका च्या बस डेपोतील जागेत असलेल्या कर्मचारी वसाहती लगतची सर्विस रस्त्यालगतची जागा ही व्यापारी संकुल साठी घेऊन कणकवली शहरात एक अद्ययावत असे व्यापारी संकुल व्हावे अशी मागणी नगराध्यक्ष पारकर यांनी केली. जेणेकरून शहरातील इतरत्र विस्थापित झालेल्या विक्रेत्यांना त्याचा उपयोग होईल व शहराच्या सौंदर्यकरणात देखील एक नीटनेटकेपणा येईल. त्याच सोबत शहरातील या विक्रेत्यांना एक हक्काची जागा उपलब्ध होईल व त्याचा फायदा एसटी प्रशासनाला होईल या उद्देशाने हा प्रस्ताव ठेवण्यात आला. जर एसटी सदर व्यापारी संकुल डेव्हलप करण्यास तयार असली तर एसटी मार्फत किंवा नगरपंचायत जवळ ही जागा हस्तांतरित केल्यास नगरपंचायत या जागेवर व्यापारी संकुल तयार करण्यासाठी पुढाकार घेईल असेही पारकर यांनी व्यवस्थापकीय संचालक यांना सांगितले. तसेच कणकवली बस स्थानकाचे सुशोभीकरण करून या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत दुकानांना जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून ही सर्व जागा उपयोगात येऊन त्याचा एसटीला फायदा होईल. व उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्याला देखील एक चांगली जागा उपलब्ध होईल. कणकवली हे जिल्ह्यातील एक प्रमुख बस स्थानक असून या बसस्थानकामध्ये दिवसाला हजारो प्रवासी ये जा करत असतात. प्रवाशांना देखील या माध्यमातून चांगली एक सुविधा या ठिकाणी निर्माण होईल. कणकवली शहरातून आशिये पर्यंत जाणारा रस्ता हा गेली अनेक वर्षांची मागणी आहे. ही मागणी पूर्णत्वास जाण्यासाठी एसटी प्रशासनाची जमीन या रस्त्यात येत आहे. तो रस्ता एसटीच्या जमिनीतून गवाणकर यांच्या हद्दीला लागून एका बाजूने करण्यास परवानगी दिल्यास आशिये गावाला जोडणारा नवीन रस्ता तयार होईल. व त्यामुळे कणकवली पटवर्धन चौकापासून या भागामध्ये होणारी वाहतूक कोंडी, आचरा रोडवरील वाहतूक कोंडीची अनेक वर्षांची समस्या यातून दूर होईल. व या नवीन मार्गामुळे कणकवली शहरात एक रस्त्याचे नवीन पर्याय तयार होतील असा देखील प्रस्ताव एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आला अशी माहिती श्री पारकर यांनी दिली. दरम्यान या तीनही प्रस्तावा बाबत व्यवस्थापकीय संचालक हे सकारात्मक असल्याचे पारकर यांनी सांगितले. तसेच याबाबतची लवकरच बैठक घेतली जाईल व याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल. व यातून काय मार्ग काढता येईल त्या दृष्टीने कार्यवाही करू अशी ग्वाही दिल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.
दिगंबर वालावलकर कणकवली






