रानगवे व वानरांच्या उपद्रवाची वनविभागाकडून तात्काळ दखल शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत मार्गदर्शन

बुधवळे (मळेशेतवाडी), ता. मालवण परिसरात रानगवे व वानरांच्या उपद्रवामुळे शेतीपिकांचे होत असलेले नुकसान तसेच वन्यप्राण्यांचा लोकवस्तीजवळ वाढलेला वावर याबाबत सामाजिक कार्यकर्ते समीर मुणगेकर यांनी वनविभागाकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत वनविभागाने बुधवारी (५ ऑगस्ट) नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. उपवनसंरक्षक मिलिश शर्मा (IFS) आणि सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी अधिनस्त कर्मचाऱ्यांसह बुधवळे (मळेशेतवाडी) परिसराला भेट देत शेतीपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर विठ्ठल मंदिर, बुधवळे येथे पंचक्रोशीतील शेतकरी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत शासनाच्या नुकसानभरपाई योजनेची माहिती देण्यात आली. नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि पुढील कार्यवाही याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन वनविभागाने दिले. वन्यजीव संरक्षणाबरोबरच वन्यप्राण्यांपासून स्वतःची व शेतीची सुरक्षितता राखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याबरोबरच भविष्यात अप्रिय घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
वनविभागाने निवेदनाची तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व मार्गदर्शन केल्याबद्दल शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते समीर मुणगेकर यांनी वनविभागाचे आभार मानले. यावेळी वनक्षेत्रपाल चेतन पाटील, सरपंच पानवलकर, सामाजिक कार्यकर्ते समीर मुणगेकर, सामाजिक कार्यकर्ते परुळेकर, वनपाल सदानंद परब, वनरक्षक अतुल खोत, वनरक्षक लक्ष्मण आमले, आरआरटी कुडाळ व मालवणचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!