जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग तर्फे मध्यस्थता जनजागृती कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ठरवून दिलेल्या शेड्युलनुसार माहे एप्रिल महिन्यात सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने काँमन मिनिमम कार्यक्रम अंतर्गत १५ एप्रिल रोजी सकाळी १०.४५ वाजता मध्यस्थीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक व्ही. डी. कदम, अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी केले. सुरुवातीला प्रास्ताविकमध्ये विद्याधर कदम यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. मध्यस्थ हा दोन कुटुंबातील, समाजातील, गावातील कलह दूर करुन सौहार्दपणे वातावरण निर्माण करतो. मध्यस्थी घडवून कुटुंबातील व्यक्तींना चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत असतो. न्यायालयामधील खटले या माध्यमातून कमी होतात. त्यामुळे न्यायालयीन कर्मचारी यांनी जास्तीत जास्त या मध्यस्थतेबाबत जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय विधीज्ञ अश्पाक शेख यांनी मध्यस्थता कायदा सन १९६५ साली लागु करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी सुरू करुन समाजाच्या भल्यासाठी सामंजस्य घडविण्यासाठी त्याद्वारे सुरुवात केली. कुटुंबातील भांडण असो किंवा समाजाच्या लोकांमधील, गावातील लोकांमधील असणारे वाद सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. यामुळे न्यायालय व पक्षकार यांच्या मध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली. न्यायालयात गेल्यानंतर कायदेशीर निर्णय या मध्यस्थी प्रक्रियेचा देखील मिळतो याची अनुभूती लोकांना मिळते. आज दरदिवशी घटस्फोटाची अनेक प्रकरणे दाखल होतात. यामध्ये सामंजस्य घडविले तरी जाते किंवा संम्मत्तीने घटस्फोट घेण्याच्या सूचना देवून योग्य प्रकारे तोडगा काढला जातो असेही सांगितले. क्षुल्लक वादातून होणारे खटले, धनादेशाचे खटले हे या प्रक्रियेत घेऊन मध्यस्थ मिटविण्यासाठी हातभार लावतात व समाज व्यवस्था एकसंध ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात.
यावेळी लोकअभिरक्षक कार्यालय सिंधुदुर्गचे मुख्य लोक अभिरक्षक ॲड. डी. के. गावकर यांनी या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि आपण कित्येक प्रकरणी मध्यस्थी केली आहे. मध्यस्थ मधुन लोक अदालत निर्माण झाली व आता राष्ट्रीय लोक अदालत, मोबाईल लोक अदालत, कायमस्वरूपी लोक अदालत ही प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्मचारी यांनी देखील या मध्यस्थतेबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले.
उपस्थितांचे आभार अधीक्षक विद्याधर कदम यांनी मानले व कार्यक्रम अध्यक्षांचे परवानगीने संपविण्यात आला.
या कार्यक्रमास ४० दिवसांचे मध्यस्थीचे प्रशिक्षण घेतलेल्या ॲड. नीता गावडे, सहायक लोकअभिरक्षक ॲड. स्वाती तेंडुलकर, ॲड. आरती पवार, ॲड. श्रुती बिले, न्यायालय व्यवस्थापक पी. पी. मालकर, अधीक्षक भाग्यवंत वाडीकर, अधीक्षक सुकांत सावंत, अधीक्षक महेश माणगावकर व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी, सिंधुदुर्गनगरी





