सिंधुदुर्गात काजू हंगाम तेजीत पण हमीभाव हवा !

बागायतदारांसहित व्यापारी वर्गाची मागणी

गोवा राज्याच्या धर्तीवर हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील ; खासदार विनायक राऊत

कुडाळ :कोकणात आंबा पिकानंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे पीक म्हणजे काजू आहे. हे पीक कमी वेळेत जास्त उत्पन्न देते. त्यामुळे कोकणात सध्या काजूची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात डोंगर क्षेत्रात तसेच बागायती भागात काजू मोठ्या प्रमाणात होते. दरवर्षी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे कोकणातील काजू बागायतदाराचे लाखो रुपयांचे नुकसान होते.
सध्या कोकणात आंबा, काजू, जांभूळ, फणस यांचा हंगाम सुरु आहे. यावर्षी आंबा कमी असला तरी काजू आणि जांभूळ पीक बऱ्यापैकी आहे. त्यामुळे काजू बागायतदार आनंदी असला तरी काजूच्या दरावर तो नाखूष असलयाचे दिसून येत आहे. एप्रिल महिना शेवटच्या टप्प्यात असून काजू बागायतदार मोठ्या प्रमाणात काजू बी विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झालेत.

सध्या काजूला १०० ते ११० रुपये किलो असा दर
सिंधुदुर्ग जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या कुडाळ तालुक्याच्या आठवडा बाजारादिवशी सुद्धा ग्रामीण भागातून काजू विक्रीसाठी येत आहे. आठवडा बाजारादिवशी मोठ्या प्रमाणात कुडाळमध्ये लाखोंची उलाढाल होत असते.सध्या काजूला १०० ते ११० रुपये किलो असा दर असला तरी त्यातून बागायतदार आणि व्यापाऱ्याला मोठी मिळकत प्राप्त होत नाही, असे व्यापारी वर्ग सांगतात. यासाठी काजूला हमीभाव द्या, अशी मागणी काजू बागायतदार वर्गाकडून मागील अनेक वर्षे होत आहे. पण प्रशासन सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांनी सुद्धा काजूला गोवा राज्याच्या धर्तीवर हमीभाव मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे म्हटले. पण यात त्यांना किती यश येईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

स्थानिक काजूला आफ्रिकन काजूची स्पर्धा
त्यात आफ्रिका देशातून सुद्धा काजू कोकणात येत असल्याने स्थानिक काजूला स्पर्धा निर्माण साली आहे. आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू प्रक्रिया उद्योग आहेत. यातून आजच्या युवापिढीला स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. तर गावातील बचतगट सुद्धा काजू उद्योग सांभाळत आहेत. परंतु, हमीभाव हा महत्वाचा मुद्दा समोर येतो. काजूपासून फेणी, ओले काजूगर, सुके काजूगर बनवून याची विक्री केली जाते. याला आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा मोठी किंमत आहे. मात्र, अजूनपर्यंत ऊस या पिकाप्रमाणे कोकणातील हे महत्वाचे पीक दुर्लक्षित राहिले आहे.
याबाबत काजूला हमीभाव मिळणे आवश्यक असून यंदा पीक चांगले आहे. हा हंगाम चालू एप्रिल किंवा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तेजीत असेल. कुडाळ बाजारपेठेत अधिकतर ग्रामीण भागातून काजू बागायतदार येत असतात. आता १०० ते ११० रुपये किलो असा दार सुरु आहे. यात मोठी वाढ पुढील दिवसात होण्याची शक्यता कमी आहे, असे काजू व्यापारी हेमंत धुरी यांनी सांगितले.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!