वर्देत २० वर्षीय विद्यार्थिनीचा चाकूने भोसकून खून; जिल्ह्यात खळबळ

संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके तैनात

गोव्याच्या दिशेनेही शोधमोहीम

ओरोस खुर्दनजीकच्या वर्दे गावातील खालची पालववाडी येथील दामिनी किरण पालव (वय २०) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या दामिनीच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून घरी परतत असताना दामिनीवर अज्ञात संशयिताने चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. तिचा मृतदेह रस्त्यालगतच्या सायल्याच्या ओहोळात आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे.
दरम्यान, संशयित गोव्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्याने त्या मार्गावरही पोलिसांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हत्येचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

error: Content is protected !!