संदीप गावडे आणी विशाल परबांच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला राजकीय वजन; दीपक केसरकरांची उपस्थिती ठरणार चर्चेचा विषय!

विरोधक म्हणून मैदानात उतरलेले दिपक केसरकर आणि विशाल परब एकाच व्यासपीठावर; सावंतवाडीत राजकीय चर्चांना उधाण

सावंतवाडी :देशभक्तीची भावना घराघरात पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाला यंदा राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.कार्यक्रमाचे समन्वयक संदीप गावडे आणी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आणि यांच्या नियोजनातून होणाऱ्या या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर उपस्थित राहणार असल्याने सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर यांच्या विरोधात विशाल परब यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणुकीतील राजकीय संघर्षानंतर आता राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्याच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.मात्र, या कार्यक्रमाकडे केवळ राजकीय चष्म्यातून पाहण्याऐवजी विशाल परब यांनी देशभक्तीच्या भावनेला राजकारणापेक्षा वरचे स्थान दिल्याचा संदेश या निमित्ताने जात आहे. निवडणुकीतील राजकीय मतभेद एका बाजूला ठेवून राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याचा सन्मान यासाठी सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

विशाल परबांचा व्यापक स्वीकार अधोरेखित?
सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत केसरकरांविरोधात आक्रमकपणे राजकीय भूमिका मांडणारे विशाल परब आता त्याच मतदारसंघात सामाजिक आणि राष्ट्रभक्तीपर उपक्रमांच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. ‘हर घर तिरंगा’सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणाईला राष्ट्रध्वजाशी जोडण्याचा आणि देशभक्तीची भावना जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न परब यांच्या नेतृत्वातून होत आहे.विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी विशाल परब यांच्या विरोधी राजकीय छावणीत असलेले नेतेही दिपक केसरकर हे सुद्धा उपस्थित राहत असल्याने विशाल परब यांच्या उपक्रमाला मिळणारा व्यापक स्वीकार आणि कार्यक्रमाची वाढती व्याप्ती राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

*निवडणुकीचा संघर्ष मागे?; राष्ट्रध्वजासाठी एकत्र येणार....*
  राजकारणात निवडणुका येतात आणि जातात; मात्र राष्ट्रध्वज आणि देशभक्ती हा सर्वांचा समान विषय आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत आमनेसामने असलेले दोन राजकीय चेहरे आता तिरंग्याच्या सन्मानासाठी एकाच मंचावर येणार असल्याने सावंतवाडीच्या राजकीय संस्कृतीतही या कार्यक्रमाचे वेगळे महत्त्व निर्माण झाले आहे.

यामुळे उद्याचा ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम हा केवळ भाजपचा कार्यक्रम न राहता सावंतवाडीच्या राजकीय पटलावर सर्वांचे लक्ष वेधून घेणारा कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे.

*युवा नेतृत्वाची वेगळी वाटचाल!*
  विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत सातत्याने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीपर उपक्रमांना चालना दिली जात आहे. ‘हर घर तिरंगा’ हा त्याच वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

एकीकडे भाजपच्या संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन, तर दुसरीकडे विविध राजकीय विचारांचे लोक आणि नेते यांना जोडण्याची भूमिका—यामुळे विशाल परब यांचे युवा नेतृत्व केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विस्तारत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
आणि म्हणूनच उद्याच्या कार्यक्रमात दीपक केसरकरांची उपस्थिती ही केवळ एका नेत्याची उपस्थिती नसून, सावंतवाडीच्या राजकारणात बदलत्या समीकरणांची आणि विशाल परब यांच्या वाढत्या राजकीय स्वीकाराची चर्चा घडवून आणणारी ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तिरंगा हातात घेऊन राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणुकीतील राजकीय संघर्ष बाजूला ठेवून एका व्यासपीठावर येणारे दिपक केसरकर आणि विशाल परब हे दृश्य सावंतवाडीच्या राजकीय चर्चेत निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे.
आता पाहायचे एवढेच की—तिरंग्याच्या साक्षीने उद्याच्या या व्यासपीठावरून सावंतवाडीच्या राजकारणाला कोणता नवा “विशाल” संदेश मिळतो?

सावंतवाडी प्रतिनिधी

error: Content is protected !!