‘नारळ लढवणे’ला अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा द्या

मंत्री आशिष शेलार यांच्याकडे रविकिरण तोरसकर यांची मागणी
कोकणातील नारळी पौर्णिमेच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘नारळ लढवणे’ या पारंपरिक प्रकाराला महाराष्ट्र शासनाने ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनीही पाठपुरावा सुरू केला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात तोरसकर यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर शेकडो वर्षांपासून नारळी पौर्णिमेनिमित्त ‘नारळ लढवणे’ ही परंपरा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. योग्य नारळाची निवड, अचूक निशाणा आणि विशिष्ट तंत्राच्या आधारे खेळला जाणारा हा कौशल्याधारित प्रकार कोकणच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असून तो जतन करण्याची गरज आहे.
अलीकडच्या काळात या परंपरेला युवकांसह महिला वर्गाचाही मोठा प्रतिसाद मिळत असून, देश-विदेशातील पर्यटकांमध्येही या सांस्कृतिक प्रकाराबाबत आकर्षण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या परंपरेला राज्य शासनाने अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिल्यास तिचे शासकीय संरक्षण होईल, पर्यटनाला मोठी चालना मिळेल, तसेच राज्यस्तरीय स्पर्धांच्या माध्यमातून युवा व महिला वर्गामध्ये कौशल्याधारित आणि साहसी पारंपरिक क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास तोरसकर यांनी व्यक्त केला आहे.
‘नारळ लढवणे’ या ऐतिहासिक परंपरेचा राज्य शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन कॅलेंडरमध्ये समावेश करून तिला अधिकृत मान्यता व प्रोत्साहन द्यावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती सिंधुदुर्गचे पालकमंत्री, कुडाळ-मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.






