पाच लाखांहून अधिक पर्यटकांकडून किल्ले सिंधुदुर्ग दर्शन

पर्यटन हंगामाला विक्रमी प्रतिसाद; मालवण पर्यटनाला चालना
किल्ले सिंधुदुर्ग ठरला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण
ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग आणि राजकोट परिसर पाहण्यासाठी यंदाच्या पर्यटन हंगामात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक लाखांहून अधिक पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिल्याची माहिती अधिकृत बंदर विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
2025–26 या पर्यटन हंगामात ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी तब्बल 5 लाख 35 हजार 160 पर्यटकांनी भेट दिली. यामुळे यंदाचा पर्यटन हंगाम स्थानिक पर्यटन व्यावसायिक, बोट चालक आणि संबंधित व्यवसायांसाठी दिलासादायक ठरल्याचे मानले जात आहे.
26 मेपासून जलपर्यटन बंद ठेवण्याचे निर्देश लागू होणार असल्याने सोमवारी हंगामाच्या अखेरच्या दिवशीही हजारो पर्यटकांनी मालवण किनारपट्टीवर गर्दी करत जलपर्यटनाचा आनंद घेत किल्ले सिंधुदुर्गाचे दर्शन घेतले.
दरम्यान, पावसाळी कालावधीनंतर 1 सप्टेंबर 2026 पासून नव्या पर्यटन हंगामाला सुरुवात होणार असून, आगामी हंगामातही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





