समुद्रात बेपत्ता राजन सारंग यांचा शोध सुरूच; ३२ तासांनंतरही ठावठिकाणा नाही

शिरोडा होडी दुर्घटना : ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने समुद्रात शोधमोहीम तीव्र
शिरोडा येथील केरवाडी समुद्रात रविवारी पहाटे झालेल्या होडी दुर्घटनेत बेपत्ता झालेले खालची केरवाडी येथील मच्छीमार राजन सारंग (वय 46) यांचा शोध सोमवारीही सुरूच होता. दुर्घटनेनंतर तब्बल 32 तास उलटून गेले तरी त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक मच्छीमार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी गणेश टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली.
किनारपट्टीवरून ड्रोनच्या सहाय्याने रेडी ते भोगवे परिसर तसेच खोल समुद्र भागात सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा या वेळेत सखोल पाहणी करण्यात आली. या मोहिमेत ड्रोन ऑपरेटर अनिकेत निकाडे, सोम ढेपस आणि विशाल शिवलकर यांनी सहभाग घेतला.
शोधमोहीमेदरम्यान सागर सुरक्षा रक्षक, स्थानिक मच्छीमार प्रतिनिधी तसेच शिरोडा मच्छीमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून शोधकार्य सुरू असून राजन सारंग यांचा लवकरात लवकर शोध लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





