…..तर अधिकाऱ्यांची गय नाही

शेतकऱ्यांसाठी संघर्षाची तयारी : एकनाथ नाडकर्णी

स्थानिकांना रोजगार मिळावा आणि तालुक्याचा विकास व्हावा म्हणून मी आडाळीत एमआयडीसी मंजूर करून घेतली. माझ्यावर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. तरीही उद्योजकांना प्लॉट द्यायचे सोडून अधिकाऱ्यांनी गैरव्यावहाराचे नसते उद्योग सुरु केलेत, असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, प्रसंगी संघर्ष करण्याची वेळ आली तरी हरकत नाही,असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिला आहे.
आडाळी एमआयडीसीतील अधिसूचित जमीन परस्पर वगळून सुमारे १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या हालचाली सुरु असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थानी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आडाळी एमआयडीसी प्रकल्पासाठी महत्वाचे योगदान असलेल्या श्री. नाडकर्णी यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ते म्हणाले ‘
दहा वर्षांपूर्वी मी स्वतः पुढाकार घेउन नारायण राणे यांच्याकडून आडाळीत प्रकल्प मंजूर करून घेतला. तालुक्यातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हा प्रकल्प आणला. मात्र आज दहा वर्षे झाली तरी प्रकल्पचे काम पुर्ण करता आले नाही. स्थानिकांनी कुठलाही विरोध न करता आपल्या जमिनी दिल्या. कोकणातील अनेक प्रकल्पना स्थानिकांनी विरोध केल्याने प्रकल्प रखडले. अशावेळी आडाळीच्या ग्रामस्थांनी जे योगदान दिले त्याचा सन्मान शासनाने ठेवायला हवा. पण आज महामंडळ आणि शासन शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे. मधल्या काळात आमच्याकडे सत्ता नव्हती. सत्ता आल्यावर प्रकल्पाला गती मिळेल असं वाटतं होत. पण उद्योग मंत्रालय उदय सामंत यांच्याकडे येऊन आठ महिने झाले, मात्र फारसा काही फरक पडताना दिसत नाही हे दुर्दैव आहे. उलट मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळमुळे आडाळीच महत्व वाढल्याने आता महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नको तेच उद्योग सुरु केल्याचे दिसत आहे.येथील उद्योगासाठीच्या जमिनीचे आरक्षण उठवून, महसूलच्या अधिकाऱ्यांनाकडून सातबारा वरती चुकीच्या नोंदी घालून बनावट कागदपत्रे बनवून कोट्यवधीचा गैरव्यवहार करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. अर्थात ग्रामस्थ जागृत आहेत.त्यांनी प्रकल्पासाठी त्याग केला आहे. त्यामुळे यापुढे महामंडळाचे अधिकारी व गैरव्यवहारात गुंतलेल्याना त्यागाची ताकद काय असते ते दाखवून देऊ. शेतकऱ्यांसाठी प्रसंगी राजकीय किंमत मोजायला माझी तयारी आहे. आज अनेक उद्योजक आडाळीत यायला तयार आहेत. त्यांना भूखंड देण्यासाठी शासन व महामंडळ तयार नाही. मात्र जमिनी विकून मलिदा लाटायचे धंदे उघडले आहेत. आता अधिकाऱ्यांनीही शिस्तीत राहावे. जनहितासाठी पक्षाच्या वरिष्ठाकडे तक्रार करण्यात येईल. अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करु, पण अशा गैरव्यवहाराला थारा देणार नाही असेही श्री. नाडकर्णी यांनी म्हटले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, दोडामार्ग

error: Content is protected !!