वागदेत “तो” चोरटा राहत असलेल्या खोलीचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न

शनिवारी मध्यरात्रीची धक्कादायक घटना
मध्यरात्री पोलीस घटनास्थळी दाखल
वागदे येथे भाड्याने राहत असलेला आंतरराज्य सराईत गुन्हेगार प्रकाश पाटील याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून नवनवीन माहिती समोर येत आहे. यामध्ये त्याच्याकडून अनेक शस्त्रांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज शनिवारी रात्री 1.45 वाजण्याच्या सुमारास प्रकाश पाटील हा आरोपी राहत असलेल्या वागदेतील त्या चाळीतील खोलीचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान याबाबत तेथील स्थानिकानी याचा सुगावा लागताच त्यांनी घरातील लाईट सुरु केल्यानंतर एक संशयित तेथील मागील बाजूला उडी मारून पळून गेल्याचे समजते. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस विनोद सुपल व वागदे पोलीस पाटील सुनील कदम यांच्यासह काहींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घराचा दरवाजा फोडण्यामागे त्या संशयिताचा नेमका काय उद्देश होता? घराच्या मागील बाजूस उडी मारून पळून गेल्याने हा संशयित स्थानिक होता का? असा देखिल प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी त्या आसपासचा परिसर ते अगदी ओसरगाव टोलनाक्यापर्यंतचा परिसरा मध्ये त्या संशयिताचा शोध घेतला. मात्र रात्रीच्या वेळेचा फायदा घेत संशयित पसार झाला. पोलिसांनी मुसक्या आवळलेला संशयित आरोपी प्रकाश पाटील राहत असलेल्या त्या खोलीत अजून काही आपल्या हाती लागेल या उद्देशाने हा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली