कुडाळमध्ये १ सप्टेंबरला रंगणार रानभाज्यांचा महोत्सव!

पं.स. तर्फे रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे आयोजन

विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे

कोकणातील पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन, प्रचार-प्रसार तसेच त्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे रानभाजी प्रदर्शन, पाककृती स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव होणार आहे.
पावसाळ्यात कोकण परिसरात मोठ्या प्रमाणात विविध रानभाज्या उपलब्ध होतात. या भाज्या पौष्टिक आणि अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असतानाही त्यांच्या विविध प्रकारांची तसेच पाककृतींची माहिती सर्वसामान्यांना पुरेशा प्रमाणात नसते. रानभाज्यांना प्रोत्साहन देऊन पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन करण्यासोबतच रासायनिक खतांवर उत्पादित होणाऱ्या बाजारातील भाज्यांना पौष्टिक पर्याय उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या पाककृती स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील बचत गटांच्या सदस्यांसह पंचायत समितीअंतर्गत अधिकारी व कर्मचारी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचे परीक्षण चव, पौष्टिक मूल्य, मांडणी/प्लेटिंग आणि स्वच्छता या निकषांवर केले जाणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹७ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ₹५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ₹३ हजार, तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल. याशिवाय पाच स्पर्धकांना प्रत्येकी ₹१ हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी आपली नावे कृषि विभाग, पंचायत समिती कुडाळ येथे जमा करावीत.
नोंदणीसाठी श्रीमती सोनिया पालव, विस्तार अधिकारी (कृषि) (९४०४४३९५७५) किंवा संदेश परब, विस्तार अधिकारी (कृषि) (९४२३८८१६६६) यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास समिती सभापती तुकाराम उर्फ दादा साईल, शेतकरी सल्ला समिती कुडाळचे अध्यक्ष मंगेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कृषि विकास अधिकारी दिशांत कोळप, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील आणि तालुका कृषि अधिकारी भास्कर चौगुले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
रानभाजी पाककला स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन कोकणच्या पारंपरिक रानभाज्यांची समृद्ध परंपरा जपण्यास हातभार लावावा, असे आवाहन पंचायत समिती कुडाळचे माजी सभापती मिलिंद वसंत नाईक व माजी उपसभापती सिताराम तेली यांनी केले आहे.

error: Content is protected !!