पूर्णानंद महिला मंच, कणकवली यांच्याकडून जागतिक आदिवासी दिन साजरा

नाग्या महादू वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दिले साहित्य भेट

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील शोषित मुक्ती अभियान संस्था संचालित नाग्या महादू आदिवासी निवासी वसतिगृहाला भेट देऊन पूर्णानंद महिला मंच, कणकवली यांच्याकडून 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन समर्पक स्वरूपात साजरा केला. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधून वसतिगृहात राहणाऱ्या मुलांची माहिती घेऊन तेथे चालणाऱ्या विविधांगी उपक्रमांना कशा प्रकारे सहाय्य करता येईल याबाबत वसतिगृह संचालिका यांच्याशी चर्चा केली होती. त्याला प्रतिसाद देऊन वसतिगृहात राहणाऱ्या मुलांच्या काय गरजा आहेत याची माहिती संचालकांनी कळविली होती.
आज मंचाच्या सोळा सदस्यांनी कडधान्ये, साखर, खाद्यतेल, खोबरेल तेल, बिस्किटे, फरसाण, साबण, टुथपेस्ट, टुथब्रश आणि तयार कपडे अशी वस्तुरूपातील भरगच्च मदतीसह वासतिगृहाला भेट दिली. प्रथम मान्यवरांच्या हस्ते नाग्या महादू यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. १९३० साली जुलमी इंग्रज राजवटीविरुद्ध चिरनेर जंगलात झालेल्या सत्याग्रहात नाग्या महादू यांनी प्राणाहुती दिली होती याची याप्रसंगी आठवण करण्यात आली. त्यानंतर मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांशी हितगुज साधले. त्यांना काही समूहगीते शिकविली.
वसतिगृह संचालिका श्रीमती आईर आणि सहकारी यांनी यावेळी महिला मंचाच्या सदस्यांचे आभार मानले. जागतिक आदिवासी दिन जगभर साजरा होत असतांना वेताळ बांबर्डे येथे देखील तो तशाच मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संधी पूर्णानंद महिला मंचामुळे आपल्याला प्राप्त झाली असे संचालकांनी आवर्जून सांगितले.

error: Content is protected !!