कणकवली तालुका व्यापारी संघाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम कौतुकास्पद!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन
कै. महेश नार्वेकर स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिरात 210 जणांची तपासणी
10 विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप
कणकवली तालुका व्यापारी संघ तसेच महिला व्यावसायिक संघटनेच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आरोग्याच्या बाबत आपण सतर्क राहिलो तर वेळीच उपचार घेणे सोपे जाते व यातून पुढील होणारा त्रास टाळू शकतो. कणकवली तालुका व्यापारी संघ सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम घेत असतो. या व्यापारी संघाच्या माध्यमातून आयोजित केलेले उपक्रम जनतेच्या हिताचे असतात असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढले. कणकवली येथे भालचंद्र महाराज संस्थान या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते कै. महेश नार्वेकर यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, डॉ. विद्याधर तायशेटे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील, विशाल कामत, डॉ. सुहास पावसकर, ॲड. विलास परब, हेमंत गोवेकर मंदार आळवे अमोल कामत मंदार सापळे दादा केनी, राजेश राजाध्यक्ष, सुशील पारकर नंदू उबाळे बंडू खोत महेंद्र मुरकर नगरसेवक रुपेश नार्वेकर, पत्रकार अशोक करंबेळकर, विलास कोरगावकर भालचंद्र महाराज संस्थान चे व्यवस्थापक विजय विजय केळुसकर, महिला व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते. यावेळी दहा विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 210 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कणकवली तालुका व्यापारी संघाचे कौतुक केले. महेश नार्वेकर यांचा समाजकार्याचा वारसा व्यापारी संघाने सुरू ठेवावा असेही आवाहन केले.
कणकवली प्रतिनिधी






