कुडाळमध्ये जिल्हास्तरीय देवळी समाज मेळावा उत्साहात संपन्न

देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळावा रविवारी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्याचे उद्घाटन माजी जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात करण्यात आले. यावेळी बोलताना राजन नाईक म्हणाले, देवळी जिल्हाभर विखुरलेला आहे. ज्ञातीबांधव विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. जिल्ह्यात देवळी समाज भवन होण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते सर्व आपण करणार आहे. समाजाच्या सहकार्याने निश्चितच येत्या काळात समाज भवनाचे स्वप्न पूर्ण होईल.
जिल्हा उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर म्हणाले, देवळी समाजात दैविक बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता आहे. सर्वच क्षेत्रात हा समाज आहे. समाज संघटित होण्यासाठी असे मेळावे महत्त्वाचे आहेत. समाजाचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात देवळी सामाजाची सुमारे दिड लाख लोकसंख्या आहे. समाज संघटित करण्यासह समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी गावागावांत समाज मंडळाच्या शाखा स्थापन करा. तरूणांनी समाजाचा वारसा पुढे नेण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ सल्लागार सावळाराम अणावकर म्हणाले, प्रत्येकाने समाजाचा अभिमान बाळगा. कधीही जात दडवू नकात. अभिमानाने देवळी असल्याचे सांगा. समाज आणखी संघटीत होण्यासाठी काम झाले पाहीजे. सर्वानी समर्पित भावनेने संघटनेचे सभासद व्हावे. समाजाची ताकद भक्कम करा, असे आवाहन त्यांनी केले. घनश्याम वालावलकर व नाईक मराठा समाजाचे संयुक्त कार्यवाह किरण नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी देवळी समाजातील दशावतारी नाट्य मंडळे, लोकप्रतिनिधी, डाॅक्टर्स, क्रिकेट मंडळे, विविध कलाकार मंडळी व दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीकृष्ण तळवणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुरूवातीलाच तुळस येथील विद्यार्थी विजय तुळसकर व त्याच्या भगिनी जागृती व कस्तुरी तुळसकर यांचा सहभाग असलेला गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांनी स्वागतगीतही सादर केले. या भावंडांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिव विष्णू चौकेकर यांनी केले. स्वागत जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांनी केले. या मेळाव्याला रमेश नरसुले, नागेश ओरोसकर, मयुर आरोलकर, जिल्हा कार्यकारीणी सदस्य भास्कर केरवडेकर, अनिल तोंडवळकर, सौ. अनघा तेंडोलकर, सल्लागार बाळ कनयाळकर व श्रीकृष्ण तळवणेकर, अरविंद तेंडोलकर, शेखर तुळसकर यांच्यासह कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य, देवळी समाज ज्ञातीबांधव, गुणवंत विद्यार्थी आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सौरभ पाटकर यांनी केले.





