माहिती असूनही पुतळा प्रकरणी आमदार निलेश राणे गप्प का ?

मनसे उपजिल्हाप्रमुख कुणाल किनळेकर यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट मालवण येथील पुतळा दुर्घटना प्रकरणी दोषींना पाठीशी घालणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता तथा शिवप्रेमी कदापी माफ करणार नाही. उलट आमदार निलेश राणे यांना राजकोट येथील पुतळा पाडणांऱ्याची माहिती असून देखील आजतागायत गप्प का असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर म्हणतात, मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी पूर्णाकृती पुतळा पडून जवळपास आज तीन वर्षे होत आली, तरी देखील पुतळा दुर्घटना प्रकरणी दोषींवर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर लगेचच निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपतींचा पुतळा तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी पाडला असे आपणास खात्रीपूर्वक माहिती असल्याचे जाहीर केले. परंतु या दुर्घटनेला आज जवळपास तीन वर्षे पूर्ण होत आली तरी अद्याप पर्यंत कोणाही दोषींवर कारवाई झालेली नाही. गेले तीन वर्षे छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळा दुर्घटना प्रकरणी शांत असलेले कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी काल पुन्हा एकदा माजी आमदार वैभव नाईक यांनीच राजकोट येथील पुतळा पाडल्याचे पत्रकार परिषद घेत आरोप केले व याप्रकरणी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांना पाठीशी घातल्याचे देखील आरोप केले.
आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर शिवप्रेमी तथा महाराष्ट्राची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. कारण महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचे नाव पुराव्यासकट माहिती असून देखील जाणीवपूर्वक केवळ राजकारणासाठी त्याचा उपयोग न करता किंवा कोणत्याही दबावाला फळी न पडता छत्रपतींचा पुतळा पाडणाऱ्यांना कठोर शासन होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे. जर का खरोखरच आमदार निलेश राणे यांना महाराजांचा पुतळा वैभव नाईक यांनीच पाडला अशी पुराव्यासकट माहिती असून देखील याप्रकरणी तीन वर्षे गप्प का बसले याचाही खुलासा तमाम शिवप्रेमी तथा महाराष्ट्राच्या जनतेला सांगावा.





