दशावतार स्त्री पात्र साकारणारा कलाकार संतोष चाळके यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्काराने गौरव

पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान
वर्दी वेलनेस फौंडेशन संस्थेकडून संतोष चाळके यांना देण्यात आला पुरस्कार
वय फक्त २५ च्या आसपास, काळा-सावळा, बारीक किरकोळ शरीरयष्टी, शांत, सालस वृत्तीचा अगदी कोणत्याही कलाकरासोबत मिसळून काम करणारा हा कलाकार. पण एखाद्या मुरलेल्या कलाकाराप्रमाणे त्याचा रंगमचावरचा वावर असतो. रंगमंचावर येताच साऱ्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अभिनय. सुमधुर गायन तेही नाविन्यपूर्ण. एकदा ऐकलं की, पुन्हा पुन्हा आठवावं आणि ते ऐकत रहावं. ज्याला पाहिल्यावरच समाधान वाटतं असा एक दशावतारी कलावंत म्हणजे बेळणे गावचा सुपुत्र कु. संतोष चाळके.
अशा या संतोष चाळके यांचा नुकताच दिल्ली येथील वर्दी वेलनेस फौंडेशन या संस्थेतर्फे राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार-२०२३ ने सन्मान करण्यात आला. पुरस्कार कार्यक्रम दिल्ली येथे संपन्न झाला.त्यावेळी संतोष चाळके यांना तेथे जाता आले नाही. म्हणून नुकतेच खवणेश्वर मंदीर, मु.खवणे येथे एका विशेष कार्यक्रमात पद्मश्री श्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते कु. संतोष चाळके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. संतोष चाळके यांच्या या कामगीरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
देवेंन्द्राने जशी अप्सरा इंद्र दरबरात आणावी तशी 'चेंदवणकर दशावतार कंपनी' चे मालक श्री देवेंद्र नाईक यांनी हे रत्न पारखलं आणि अल्पावधीतच त्याला आपल्या दशावतार दरबारात आणले. आज अनेक नाविन्यपूर्ण भूमिका साकारणारा संतोष देवेंद्र नाईक यांच्या कंपनीत त्याच्या कलेचा ठसा उमटविताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा संतोष स्पष्टपणे बघणाऱ्याला सहज भावतो.
‘कृष्ण सुदाम’ मधील ‘सात्विक रुक्मिणी’ तर कधी ‘गर्विष्ठ सत्यभामा’, ‘पतिव्रता तेज’ मधील ‘सोज्वळ स्त्री’ तर कधी ‘गौरी स्वयंवर’ मधील ‘भ्रमिष्ट गौरी’ प्रत्येक भूमिका वेगळेपणाने साकारावी ती संतोषनेच. ‘वज्रशल्क’ मधील भक्तीपूर्ण ‘भद्रा’ तर लौकीकास पात्र ठरली.
रंगमचवरचा वावर, वैविध्यपूर्ण मेकअप, नाविन्यपूर्ण वेशभूषा, लौकीकास साजेल अशी विषयाची मांडणी आणि हे सर्व कमी म्हणून गोड आणि मधुर गायन. एरव्ही बघायला गेले तर नुसता साधासुधा दिसणारा संतोष खरच हे एवढं सगळं करू शकतो यावर विश्वासच नाही बसणार. कलाकार म्हणून तो एक ‘बाप कलाकार’ आहे.
ज्या प्रकारे त्याने स्वतःला रंगदेवता आणि रंगमंचाच्या सेवेला स्वतःला वाहून घेतले आहे, ते पाहता संतोषच्या कलेला सलाम…
अस्मिता गिडाळे, खारेपाटण