12 तासाच्या आत केले खुनातील आरोपीला जेरबंद
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची उल्लेखनीय कामगिरी
मसवी रस्त्यावर प्रसाद लोके खून प्रकरण
दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी मिठबांव येथे राहणारा प्रसाद परशुराम लोके, (वय 31 वर्षे) याचा मुणगे मसवी रस्त्यावर रक्ताच्या थारोळयात मृतदेह आढळला होता. या मृतदेहाजवळ वाहन क्रमांक MH-07-AG-7569 ही वॅगनआर गाडीसुध्दा सापडली. सदर गाडीची तोडफोड केल्याचे दिसून येत होते.
सदर घटनेची माहिती प्राप्त होताच देवगड पोलीस ठाणे, तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले, सहा. पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके, व स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा संपुर्ण अभ्यास करण्यात आला. फॉरेन्सीक टिम व डॉगस्कॉड यांना पाचारण करून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी घटनास्थळास पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल व उप विभागीय पोलीस अधिकारी, कणकवली श्री. के. एल. सावंत यांनी भेट देऊन तपासास मार्गदर्शन केले. सदर गुन्हयाची नोंद देवगड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 140/2023 कलम 302 भा.द. वि. अन्वये करण्यात आली. मयताने मिठबांव ते मुणगे मसवी या रत्याने प्रवास केलेला प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याने सदर रस्त्यावर
असलेल्या शासकीय तसेच खाजगी कॅमे-याची सी. सी. टिव्ही फुटेजची सुध्दा पाहणी करण्यात आली. परंतु त्यामध्ये कोणतेही संशयास्पद वाहन मयताच्या वाहनाचे पुढे किंवा पाठी येता जातांना दिसले नाही. मयताचा मोबाईल घटनास्थळावर मिळून आलेला नव्हता. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने मयताच्या मोबाईल फोन क्रमांकांचे विश्लेषण केले. त्याचबरोबर मयतांचे नातेवाईकांकडे तसेच मित्रमंडळीकडे चौकशी करता, मयत हा मिठबांव येथे महा ई सेवा केंद्र तसेच भाडयाने वाहन पुरविण्याचे काम करीत असे अशी माहिती प्राप्त झाली. 17/09/2023 रोजी मयतला भाडे तत्वावर वाहन पाहीजे असल्याचा फोन आल्याचे त्यांचे कुटुंबियांना सांगितले होते. तो दिनांक 18/09/2023 रोजी सकाळी 03.30 वाजण्याच्या सुमारास घरामधुन निघुन गेला होता. प्राप्त गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सदरचा गुन्हा हा किशोर परशुराम पवार, रा. कुंभारमाठ, ता. मालवण याने केल्याचे निदर्शनास आल्याने त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा याच आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा गुन्हयातील सहभाग स्पष्ट झाल्याने देवगड पोलीस ठाण्याने त्यास अटक केलेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. बगळे, पोलीस निरीक्षक, देवगड पोलीस ठाणे हे करीत आहेत. गुन्हयातील आरोपीचा कोणताही मागमूस नसतांना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हा घडल्यापासुन 12 तासाचे आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. के. एल. सावंत यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहा. पोलीस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजु जामसंडेकर, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, पोलीस नाईक आशिष जामदार, पोलीस कॉन्स्टेबल यश आरमारकर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुदंळेकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे व ओ. टी. बी. पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल रवि इंगळे यांना गुन्हा उघडकीस आणण्यात यश आहे. या कामगिरीबद्दल सिंधुदुर्ग पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली