घरगुती गॅस तपासणीसाठी ₹236 वसुलीवर प्रश्नचिन्ह

जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी HPCLकडे मागितला खुलासा
ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा हद्दीत घरगुती गॅस जोडणी तपासणीच्या नावाखाली प्रत्येक ग्राहकाकडून ₹236 शुल्काची सक्तीने वसुली केली जात असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी HPCL एलपीजी विभागाच्या सिंधुदुर्ग-गोवा प्रादेशिक कार्यालयाकडे तातडीने खुलासा मागितला आहे. तसेच, लेखी स्पष्टीकरण मिळेपर्यंत ही वसुली तात्काळ स्थगित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतीने 29 जुलै 2026 रोजी काढलेल्या पत्रानुसार, HPCLच्या घरगुती गॅस जोडणीची अनिवार्य तपासणी करण्यासाठी प्रत्येक ग्राहकाकडून ₹236 शुल्क ‘कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ’ मार्फत आकारण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गावातील ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे पावसकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
10 ते 15 वर्षांपूर्वी गॅस जोडणी घेतलेल्या ग्राहकांनाही हे शुल्क भरण्यास सांगितले जात असून, या शुल्कामागील HPCLचे परिपत्रक, नियम किंवा शासन आदेश नागरिकांसमोर सादर करण्यात आलेला नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच गॅस कंपनीकडून थेट वसुली न करता ती सहकारी संस्थेमार्फत का केली जात आहे, याचाही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तपासणी न केल्यास गॅस जोडणी बंद केली जाईल का, ग्राहकांना इतर अधिकृत मेकॅनिककडून तपासणी करून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे का, तसेच ग्रामपंचायतीने संबंधित पत्र कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या ठरावाच्या आधारे काढले, याची चौकशी करण्याची मागणीही पावसकर यांनी केली आहे.
HPCLकडून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा देण्यात यावा आणि तोपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेली सक्तीची शुल्कवसुली थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतची प्रत गटविकास अधिकारी, पंचायत समिती कुडाळ यांनाही आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.






