आचरा उर्दू शाळेत शिक्षकांसाठी शाळा बंद आंदोलन

कामगिरी शिक्षकाचा कार्यमुक्त आदेश रद्द करेपर्यं शाळा बंद ठेवण्याचा पालकांचा निर्धार
पहिली ते आठवीपर्यंत आणि चाळीस पटसंख्या असलेल्या आचरा उर्दू शाळेत तीन शिक्षकांपैकी एक शिक्षक कामगिरीवर काढल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याबाबत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती पालक आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.
आचरा येथील उर्दू शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असून सुमारे चाळीस पटसंख्या आहे.या शाळेत तीन शिक्षक कार्यरत होते.मात्र
आचरा उर्दू शाळेत कार्यरत शिक्षिका श्रीमती नसरीन अब्दुल करीम ख्वाजा यांची कामगिरी बदली जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी उर्दू येथे करण्यात आलेली आहे. त्यांच्या जागी पर्यायी शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाराप तालुका कुडाळ येथील शिक्षक इरफान मोहम्मद फकीर शेख यांची बदली कामगिरीवर आचरा उर्दू शाळेत करण्यात आली होती. मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता सदर शिक्षकाला परस्पर मूळ शाळेत हजर होण्यासाठी आदेश काढण्यात आल्याने आचरा उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे .या बाबत ६ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्यास गेलेल्या पालकांना बेजबाबदार उत्तरे दिल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.यामुळे जोपर्यंत इरफान शेख यांच्या आचरा उर्दु शाळेतून कार्यमुक्तीचे आदेश रद्द होत नाही किंवा मूळ शिक्षिका पुन्हा शाळेत हजर होत नाही तोपर्यंत शाळा बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आचरा उर्दू शाळेच्या पालक ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबतची माहिती ग्रामस्थ पालक इमू मुजावर यांनी दिली.






