आचरा येथील बंद सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा होणार सुरू

आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांची सपोनि कातीवले यांच्याशी झाली चर्चा
आचरा गावात मोक्याच्या जागी बसविण्यात आलेले अंदाजे सतरा सीसीटीव्ही कॅमेरे मागील काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.याबाबत आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार नव्याने स्विकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्याशी झालेल्या चर्चेत सर्व तोपरी सहकार्याची ग्वाही दिल्यानंतर सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी ग्रामपंचायतीतर्फे लाईटबील भरण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे गेले अनेक महिने बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आचरा गावात मोक्याच्या ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे शासनाकडून बसविण्यात आले होते.याचे संपूर्ण लाईट बील ग्रामपंचायत तर्फे भरण्यात येत होते.मात्र ग्रामपंचायत तर्फे पारवाडी नदी किनारी बसविण्यात आलेल्या सौर पथदिव्यांची बॅटरी व पॅनेल अज्ञाताने चोरुन नेण्याची घटना २५आक्टोबर २०२४ दरम्याने घडली होती.याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. या चोरी प्रकरणाबाबत काही माहिती मिळण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत तर्फे आचरा पोलीस स्टेशनला त्या कालावधीतले सीसीटीव्ही फुटेज मागण्यात आले होते.त्या मागणीची पुर्तता न झाल्याने त्यावेळी सहकार्य मिळत नसेल तर लाईट बिल का भरायचे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरॅचे लाईट बील भरणे ग्रामपंचायत तर्फे बंद करण्यात आले होते.परीणामी आचरेगावातील सीसीटीव्ही कॅमेरे विद्युत पुरवठ्या अभावी बंद पडले होते.याबाबत गुरुवारी नव्याने हजर झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्याशी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी केलेल्या चर्चेत सपोनि संजय कातीवले यांनी काही अटी शर्थींचा विचार करून सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही दिल्यानंतर ग्रामपंचायत तर्फे लाईटबील भरण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी सरपंच जेऱॉन फर्नांडिस यांनी ग्रामपंचायत येथेही स्क्रीन बसविण्यात यावा अशी मागणी केली.यावेळी संबंधितांशी याबाबत चर्चा करून तशाप्रकारची सुविधा देता येऊ शकते का याची माहिती घेऊन तशी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे कातीवले यांनी सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर ,अभय भोसले, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर,चंदू कदम, माजी उपसरपंच अनिल करंजे, पांडुरंग वायंगणकर, डॉ प्रमोद कोळंबकर,उदय घाडी, जगदीश पांगे,प्रफुल्ल घाडी, शैलेश मुणगेकर आदी उपस्थित होते.






