पक्षीय कारणातून ठेकेदारांची बिले रखडणार नाहीत!

राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्गतील ठेकेदारांना आश्वासन
येत्या १५ एप्रिल पर्यंत मंजूर कामांचा निधी पूर्णपणे देण्याची ग्वाही
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळालेली मात्र ३१ मार्चपर्यंत निधी अभावी बिले प्रलंबित राहिलेल्या विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. मी कोणत्याही पक्षीय राजकारणातून बिले थांबवणार नाही. ज्या ठेकेदारानी कामे केली त्यांची पूर्णपणे बिले दिली जातील त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे स्पष्ट आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांना दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांनी आज कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांची मुंबई भेट घेतली. यावेळी 31 मार्चपर्यंत केलेल्या विकास कामांकरिता निधीची आवश्यकता होती. मात्र अद्याप हा निधी आलेला नाही. त्यावर रवींद्र चव्हाण यांनी येत्या 15 एप्रिल पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला जेवढा निधी आवश्यक असेल व जी कामे ठेकेदारांनी केली आहे त्या सर्व कामांची बीले काढण्याकरता निधी उपलब्ध करून दिला जाईल. मी पालकमंत्री असेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाला निधी कमी पडू देणार नाही. मात्र ठेकेदारानी रस्त्याची कामे दर्जेदार करावीत. रस्त्यांच्या कामाबाबत तक्रारी येता नयेत. मी कोट्यावधींचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांना दिला त्याच्या बातम्या आल्या नाहीत. मात्र काही निधी कमी पडला त्याच्या बातम्या आल्या अशी खंत देखील बांधकाम मंत्र्यांनी व्यक्त केल्याची समजते. मुंबईत या भेटी प्रसंगी ठेकेदार आबा मुंज, रामदास विखाळे, एपी सावंत, राहुल केलूसकर, अमित मयेकर, मिलिंद केळुस्कर, हरीश जनक, देवानंद पालांडे आदि ठेकेदार उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली