बहुजन… कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम केले आहेच, यापुढे केंद्रसरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना खेड्यापाड्यात राबवण्याचा संकल्प केलाय – सुनिल तटकरे

आम्ही या देशाच्या संविधानाशी नेहमी एकनिष्ठ राहिलो आहोत आणि कायम राहणार…

महायुतीची जाहीर सभा पाभरे पंचायत समिती गणात पार…

म्हसळा – माझ्या बहुजन… कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम या मतदारसंघात केल्याचे सांगत केंद्रसरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना खेड्यापाड्यात राबवण्याचा संकल्प केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील पाभरे येथे महायुतीच्या जाहीर सभेत दिली.

अनेक पायाभूत सुविधा माझ्या मतदारसंघात उभारल्या आहेत आणि उर्वरितही लवकरच पूर्ण केल्या जातील. प्रत्येक समाजाने काम सांगायचे आणि सुनिल तटकरे यांनी काम केले नाही असे कधी झाले नाही असेही सुनिल तटकरे म्हणाले.

संकटे येतात ती जातपात बघून येत नाहीत. आली तर सर्वांना फटका बसतो. रायगड मतदारसंघात आलेल्या संकटकाळात इथल्या जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम केले.
अडचणीच्या काळात इथल्या जनतेला शासनाकडून कोट्यवधी रुपयांची मदत मिळवून दिल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आम्ही या देशाच्या संविधानाशी नेहमी एकनिष्ठ राहिलो आहोत आणि कायम राहणार आहोत परंतु लोकांच्या मनात दूषित वातावरण निर्माण करून जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र धर्मनिरपेक्ष विचार घेऊन संविधानाशी प्रामाणिक रहात काम करत असल्याची ग्वाही सुनिल तटकरे यांनी दिली.

दिघी बंदर अदानी यांनी घेतले आहे मात्र यापासून माझ्या कोळी बांधवांना जराही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

या मतदारसंघात सर्व धर्मांना समावेश करणार्‍या कामाची रचना केली आहे. हिंदू धर्मातील विविध सणांमध्ये मुस्लिम बांधव शुभेच्छा देतात आणि आम्ही त्यांना ईदीला शुभेच्छा देतो हा आमचा सर्वधर्मसमभाव आहे. हा आमचा कित्येक वर्षापासून सुरू असलेला भाईचारा निवडणूकीत येऊन खराब करु नका असा इशाराही सुनिल तटकरे यांनी दिला.

सुषमा अंधारे यांनी अदितीवर टिका केली. माझ्या महिलांना सन्मान ज्या अदितीने राज्याचे चौथे धोरण आणून दिला. ज्या लेकीने आपल्या आईचे नाव पहिल्यांदा लावण्याचा निर्णय घेतला हा मातृत्व सन्मान केलेल्या अदितीवर सुषमा अंधारे तुम्ही महिला म्हणून बोलता ही गोष्ट महिलांना नक्कीच खटकणारी आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

माझ्या भावांना, बहिणींना ज्यावेळी गरज असते त्यावेळी आम्ही उपलब्ध असले पाहिजे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

म्हसळा तालुक्यातील पाभरे पंचायत समिती गणातील पहिली महायुतीची जाहीर सभा पाभरे गावात मोठया उत्साहात पार पडली

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष समीर बनकर, भाजप तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रसाद बोर्ले, मनसे तालुकाध्यक्ष सौरभ गोरेगावकर, आरपीआय तालुकाध्यक्ष राजेश तांबे आदींसह पाभरे गणातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!