बॅ. नाथ पै नर्सिंग अकॅडमीत जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात

आरोग्य तपासणी शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्तनपान जनजागृतीचा प्रभावी संदेश

बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी, कुडाळ येथे १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ विविध जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या ‘जीवनातील शाश्वत सुरुवातीसाठी स्तनपानाचे महत्त्व’ या जागतिक आरोग्य संघटनेच्या संकल्पनेवर आधारित विविध स्पर्धा, आरोग्य शिक्षण आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांसाठी कविता वाचन, स्टोन आर्ट, लाईन आर्ट आणि कोलाज अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे गर्भवती व स्तनदा मातांना स्तनपानाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
४ ऑगस्ट रोजी उपकेंद्र हुमरमळा येथे कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरूर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था संचलित जनऔषधी केंद्र, पिंगुळी आणि बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भवती व स्तनदा मातांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात लाभार्थी मातांची आरोग्य तपासणी करून त्यांना गर्भारपणात उपयोगी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. सुमन सावंत आणि प्रा. वैजयंती नर यांनी स्तनपानाच्या महत्त्वावरील माहिती पुस्तिका तयार करून लाभार्थी मातांना वितरित केल्या. सप्ताहाच्या समारोपप्रसंगी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
या उपक्रमासाठी प्रा. सुमन सावंत व प्रा. वैजयंती नर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, प्राचार्या कल्पना भंडारी, उपप्राचार्या वैशाली ओटवणेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे जागतिक स्तनपान सप्ताह यशस्वी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.

error: Content is protected !!